Join us

"९३ वर्षांचा आहे रे मी,तुला भेटायचं होतं..पण" ज्येष्ठ रंगकर्मींनी समीर चौघुलेला केला फोन अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 3:36 PM

महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा संवेदनशील समीर प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणेच भासतो.

मराठी कलाविश्वात आज असे काही कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे समीर चौगुले. उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीमुळे हा अभिनेता आज घराघरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा समीर प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणेच भासतो.

समीर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. समीरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यानं नुकतीच ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याचं सांगितलं आहे. या खास भेटीचा अनुभव आणि फोटो त्याने पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे.

समीरची पोस्टज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मी मोहनदास काका सुखटणकर यांच्या घरी जाऊन त्यांचे आशिर्वाद घेण्याचा योग आला. ९३ वर्षांच्या या तरुणाने आजवर रंगभूमीवर केलेलं कार्य, काम, किस्से प्रत्यक्ष त्यांच्या मुखी ऐकणे हे अत्यंत आनंददायी होत..मोहनकाका "महाराष्ट्राची हास्यजत्रा" नियमित बघतात आणि त्यांना माझे काम खूप आवडते हे त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आमच्या दूरध्वनी वरील संभाषणात सांगितले होते ... भेटायचा योग मात्र माझ्या कार्यबाहुल्यामुळे येत नव्हता..पण एक दिवस त्यांचा दूरध्वनी आला.."समीर...अरे ९३ वर्षांचा आहे रे मी...तुला येऊन भेटायची इच्छा खूप आहे..पण शक्य होत नाही रे"...कुठेतरी आत चर्र झालं....गेले काही महिने थोडा वेळ ही काढता न यावा इतकं ही मोठ काम मी नक्कीच करत नसल्याची जाणीव झाली...स्वतःचाच राग आला... आणि त्याच दिवशी मी मोहनकाकांना त्यांच्या अंधेरीच्या घरी जाऊन भेटून आलो...

मला भेटल्यावर मोहन काकांनी मला घट्ट मिठी मारली...त्यांच्या मिठीत वडीलकीची माया, थरथर आणि डोळ्यात आसवं होती...मला ही क्षणभर भरून आल...त्यांनी काठी टेकवत एखाद्या मोठ्या सत्कारमूर्तीचा करतात तसा शाल श्रीफळ देऊन माझा सत्कार केला.. मी वाकून नमस्कार केला..मला सुरकुत्या पडलेल्या हातांनी भरभरून आशिर्वाद दिले ..मला म्हणाले "तुझं आणि माझं दैवत एकच चार्ली चॅप्लिन...तू केलेला चार्ली चॅप्लिन बघितला तेव्हापासून तुला भेटायची इच्छा होती".....मला म्हणाले " तू आत्ता ज्या जागेवर बसला आहेस ना त्या जागी काही वर्षांपूर्वी "वपु" बसून गेले आहेत...विंदा बसून गेले आहेत..पुल भाई बसले होते" मला काय react व्हावं तेच कळेना .पुढचा अर्धा तास मी मोहन काकांचे किस्से, त्यांच्या संगीत नाटकांच्या आठवणी, त्या काळची दैवी माणसे याबद्धल फक्त ऐकत होतो आणि साठवत होतो. फोनवर त्यांच्या ऐकलेला थकलेला आवाज त्या क्षणी गायब झाला होता....एक तुकतुकीत कांतीचा विलक्षण प्रतिभा असलेला एक तरुण माझ्या समोर मला दिसत होता.. अनुभवाने, आपल्या कामाने पर्वताहून मोठ्या असलेले हे रंगकर्मी अत्यंत खुल्या दिलाने माझं कौतुक करत होते...सध्याच्या कठीण काळात सातत्याने हास्य फुलवण्याच काम केल्याबद्धल आमच्या हास्यजत्रेच्या कुटुंबाला भरभरून आशिर्वाद देत होते....मोहन काकांना भेटून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या पिढीची आपल्या कामावर असलेली निष्ठा... आणि काकांना भेटून एक गोष्ट मी अक्षरशः लुटली ती म्हणजे.... "समाधान"..तुम्हाला कधी ही जुनेजाणते रंगकर्मी दिसले तर आवर्जून त्यांना भेटायला जा... त्यांची चौकशी करा...त्यांना किंचित nostalgic होऊ द्या..... 

टॅग्स :समीर चौगुलेमहाराष्ट्राची हास्य जत्रा