'सावळ्याची जणू सावली' (Savalyachi Janu Sawali) मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) सावलीची भूमिका साकारणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्राप्तीने बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला. तिने भूमिकेबद्दल सांगितले की, "माझ्या भूमिकेचं नाव सावली आहे. तिला गायनाची प्रचंड आवड आहे. तिचे बाबा तिला लहानपणापासून म्हणायचे की सावलीच गाणं म्हणजे १०० नंबरी सोनं. ती खूप समंजस आणि समजूतदार आहे, कमी वयात तिच्यावर जबाबदाऱ्या आल्यामुळे सगळ्यांना सांभाळून घेण्याचं तिचं व्यक्तिमत्व आहे.
प्राप्ती रेडकर म्हणाली की, सावली विठ्ठलाची खूप मोठी भक्त आहे ती विठ्ठलासाठी काहीही करू शकते. सावलीसाठी पांडुरंग हा तिचा जिवलग मित्र आहे. तिचा रंग सावळा असल्यामुळे सगळे तिचा तिरस्कार करतात पण ती कधीच कोणाचं वाईट चिंतत नाही, सगळ्यांची मदत करायला धावून जाते. सावलीच कुटुंब वारकरी संप्रदायातील आहे, तिच्या बाबांचं नाव आहे एकनाथ, आईच नाव आहे कानू, तिला दोन भाऊ आहेत. मोठ्या भावाचं नाव सुखदेव त्याच्या बायकोच नाव आहे जयंती. सावलीची वहिनी जयंती तिचा खूप तिरस्कार करते. तिच्या लहान भावाचं नाव अप्पू आहे ज्याला हृदयाचा आजार आहे. असा सावलीचा परिवार आहे.
ती पुढे म्हणाली की, माझी सावलीसाठी निवड झाली याचा किस्सा सांगायचं झाला तर असा कि मी याआधी एक मालिका करत होते तेव्हाच मला सावळ्याची जणू सावलीसाठी कॉल आला होता. तर मी थोडी विचारात होते की काय करायचं. मी ऑडिशन देण्यासाठी गेले. सावलीच्या ऑडिशनला मी सावली सारखा लूक केला होता, त्यांना माझ्या पहिल्या टेकमध्येच ऑडिशन खूप आवडलं. पण मी काही आशा ठेवली नव्हती की मला ही भूमिका मिळेलच. मला दुसऱ्यांदा कॉल आला दुसऱ्या ऑडिशनसाठी ते ही त्यांना आवडलं त्या नंतर एक दिवस लूक टेस्टसाठी कॉल आला. खूप प्रयोग केले सावलीच्या लूकसाठी त्यानंतर मला माझी निवड झाल्याचे कळवण्यात आले. मला विश्वासच बसत नव्हता की खरंच माझी निवड झाली आहे. मी देवाचे आभार मानले, आई-बाबांना सांगितले आणि आम्ही ठरवले होते की जो पर्यंत प्रोमो नाही येत तो पर्यंत हे आपल्यातच ठेवायचे.
मला अजून लक्षात आहे की मला आमचे क्रिएटिव्ह आहेत त्यांनी मला प्रोमोचा फर्स्ट कट दाखवला होता आणि मी स्तब्ध झाले होते इतका उत्कृष्ट प्रोमो झाला होता. दिग्दर्शन, शूट सगळ्याच गोष्टी अप्रतिम झाल्या होत्या. जेव्हा प्रोमो सोशल मीडियावर आला तेव्हा मी अक्षरश: रडले. मला तो क्षण अजूनही लक्षात आहे मी प्रवासात होते आणि ट्रेन मध्ये मी फोनवर प्रोमो पहिला, नंतर आई-बाबांना कॉल केला की घरी आल्यावर सरप्राईझ आहे. माझे आई-बाबा सतत तो प्रोमो रात्री उशिरा पर्यंत बघत होते, असे तिने सांगितले.