Join us

'...तर मी डिप्रेशनमध्ये गेले असते', 'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 6:55 PM

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अरुंधतीच्या सून अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिने साकारली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अरुंधतीच्या सून अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने साकारली आहे. नुकताच स्टार प्रवाह वाहिनीचा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी अश्विनीने अनघाच्या भूमिकेबद्दल सांगताना तिचे काही अनुभव शेअर केले. 

अनघाची भूमिका प्रेक्षकांना खूप भावते आहे. या भूमिकेबाबत अश्विनी महांगडे म्हणाली की, अनघा हा समाजातील अशा मुलींचा चेहरा आहे ज्या मुली घटस्फोटित आहेत. डिप्रेशनमध्ये आहेत. त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरून समाजातील महिलांसाठी काम केलं आहे. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा लग्न करण्याची संधी येते. त्यावेळेला स्वतःला शांत करून एका नवीन कुटुंबात समाविष्ट होणं या सगळ्या गोष्टी अनघाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. 

दुःख येत राहतात परंतु त्यामुळे जगणे थांबत नाही हेच सांगण्याचे काम अनघाने केले आहे. जशा अनघाच्या आयुष्यात अनेक दुःख संकटे आली तसाच काळ माझ्याही आयुष्यात आला जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले. अनेक चढउतार अनुभवले. त्यावेळीही त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की आपण नेहमी कलाक्षेत्रासाठी स्वतःला वाहून न्यावे. जर मी हे करत नसते तर मी नक्कीच डिप्रेशनमध्ये गेले असते. तुम्ही दुःखी असाल, तुमच्यावर कितीही मोठं संकट जरी आले तरी तुम्हाला एकच सांगेन की तुम्ही काम सोडू नका, असे यावेळी अश्विनी सांगत होती.तुम्ही जितके कामात असाल तितके गुंतून राहता आणि वाईट विचार तुमच्यापासून दूर जातात. अनघाच्या भूमिकेने मला चांगली लोकप्रियता मिळाली आहे, असेही तिने सांगितले.
टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिका