स्मॉल स्क्रीनवर वेगवेगळ्या मालिका प्रसारीत होत असतात. या मालिकांपैकी काही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करतात. या मालिका बंद झाल्या तरी रसिकांच्या मनात त्यांचं स्थान कायम करुन जातात. अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे उंच माझा झोका. ५ मार्च, २०१२ रोजी उंच माझा झोका ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि खूप लोकप्रिय झाली. या मालिकेतून रमाबाई रानडे यांचा जीवन प्रवास रेखाटण्यात आला होता. या मालिकेत शरद पोंक्षे, कविता लाड, शैलेश दातार, शिल्पा तुळसकर प्रमुख भूमिकांमध्ये झळकले होते. मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते ते छोट्या रमाबाईंनी. या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार तेजश्री वालावलकर ((Tejashree Walawalkar)) हिने साकारली होती. तेजश्री आता बरीच मोठी झाली आहे. दरम्यान रमाबाई रानडे यांच्या जयंती निमित्त तेजश्रीने पोस्ट शेअर करत मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
तेजश्री वालावलकर हिने इंस्टाग्रामवर उंच माझा झोका मालिकेचा प्रोमो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आणि व्हिडीओ शेअर करत लिहिले की, २५ जानेवारी, ज्यांनी समाजाला आणि मला ही एक वेगळी ओळख आणि खूप काही दिले अशा रमाबाई रानडे यांचा आज जन्मदिन.माझ भाग्य की मला रमाबाईंची भूमिका साकारायला मिळाली....अजूनही लोक जेव्हा रमा अशी हाक मारतात तेव्हा रमाबाईंचे आशिर्वाद क्षणोक्षणी जाणवतात..
बालपणापासून तेजश्री कलेशी जोडली गेली आहे. तिला लिखाणाची आवड आहे. तिने दोन बालनाट्येसुद्धा लिहिली आहेत. भालबा केळकर प्रतिष्ठानतर्फे तिने सादरही केली होती. ‘हो, मला जमेल’ आणि ‘दहीहंडी’ ही ती दोन नाटके दिग्दर्शित केली आणि त्यात अभिनयही केला होता. अस्मिता चित्रच्या मालिकेत तिने अशोक सराफ यांच्यासह काम केले होते. २०१० साली ‘आजी आणि नात’ या चित्रपटातही ती झळकली होती. याच वर्षी तिला शाहू मोडक प्रतिष्ठानचा पुरस्कारही मिळाला आहे.