Join us

"स्वातंत्र्य वगैरे अफवा आहेत मुली...", कोलकाता बलात्कार प्रकरणावर अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 1:09 PM

Vaishali Bhosale : अभिनेत्री वैशाली भोसले हिने इंस्टाग्रामवर कोलकाता बलात्कार प्रकरणावर पोस्ट शेअर केली आहे.

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील, प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या (Kolkata Rape Case) घटनेनंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे. कलाकार मंडळीदेखील या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान आता सारं काही तिच्यासाठी मालिकेतील अभिनेत्री वैशाली राहुल भोसले (Vaishali Rahul Bhosale) हिने इंस्टाग्रामवर खरमरीत पोस्ट शेअर केली आहे.

वैशाली भोसले हिने इंस्टाग्रामवर कोलकाता बलात्कार प्रकरणावर पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले की, घरातून बाहेर पडायची…. कामावर जायची..भीती वाटायला लागलीये आता..अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं स्वातंत्र्य मिळालं..पण तोच आवाज दाबण्याचं स्वातंत्र्य तर आहेच की पूर्वापार…जिथे माणुसकी उरली नाही तिथे काय स्त्री आणि काय पुरुष.. काय सीता, मंदोदरी, द्रौपदी काय तारा,अहिल्या..काय मोमीता आणि काय निर्भया..स्वातंत्र्य वगैरे अफवा आहेत मुली..कधी तुझी निर्भया होईल सांगता येत नाही.. 

तिने पुढे म्हटले की, कामाच्या ठिकाणी गपगुमान दिलेलं काम कर.. चूक कोणाची ही असेल तुला बोल लागले गपचूप सहन कर..तुझ्यासमोर आणि कुणाला लायकी नसताना ही डोक्यावर घेतलं जाईल तू शांतपणे त्याचा मम म्हणून स्विकार कर..अन्यायाविरुद्ध आवाज उठवशील, स्वाभिमानासाठी लढशील, स्वत्व जपायचा प्रयत्न करशील..बाई ग इथे सगळं गोलमाल आहे..इथे पुरुषी ईगो त्याच्या लिंगात आहे..! कधी ईगो विकृतीचं रूप घेईल…सांगता येत नाही.. तू बाई तुझी तुझीच चरफड तडफड आकांडतांडव कर आतल्याआत..! तुझ्यापुरताच..!!

तुझं असणं सुद्धा तुला निर्भया बनवू शकतं..

कारण तुझी साधी गरज सुद्धा त्यांना चैन वाटू शकते..तुझं हसणं..! खूश असणं..! स्वच्छंदी असणं..! त्याच्यातल्या जनावराला उद्युक्त करू शकतं..सांभाळ बाई…तुझं असणं सुद्धा तुला निर्भया बनवू शकतं.., असे तिने पोस्टमध्ये म्हटलंय.