ज्येष्ठ कलाकारांसाठी टीव्हीवर पुरेशा भूमिका नाहीत-कुशल पंजाबी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 7:58 AM
टीव्ही मालिकांमध्ये ज्येष्ठ कलाकारांच्या भूमिका कमी होत चालल्या असल्याच्या वास्तवाशी त्याचे बहुतेक सहकलाकार जुळवून घेत सले, तरी ‘स्टार भारत’ ...
टीव्ही मालिकांमध्ये ज्येष्ठ कलाकारांच्या भूमिका कमी होत चालल्या असल्याच्या वास्तवाशी त्याचे बहुतेक सहकलाकार जुळवून घेत सले, तरी ‘स्टार भारत’ वाहिनीवरील ‘क्या हाल, मिस्टर पांचाल?’ या विनोदी मालिकेत शिवजीची भूमिका साकारणारा अभिनेता कुशल पंजाबी हा मात्र त्याबाबत अजूनही आशावादी आहे. टीव्ही मालिकांकडे परतलेल्या या कलाकाराने सांगितले, “टीव्ही मालिकांमध्ये अनुभवी,ज्येष्ठ कलाकारांसाठी आता पूर्वीइतक्या भूमिका उपलब्ध नाहीत, हे मला ठाऊक आहे. ज्येष्ठ कलाकारांसाठी टीव्ही मालिकांमध्ये पुरेशा भूमिका नाहीत, हे खरंच आहे. परंतु प्रेक्षकांनाच आता सतत नवे, ताजे चेहरे पाहण्याची सवय लागल्याने निर्माते आणि वाहिन्यांना त्याची दखल घ्यावीच लागत आहे. परिणामी तरुण अभिनेत्यांना अधिक मागणी आली आहे. हिंदी चित्रपटांमध्ये 45 वर्षांचा अभिनेता अजूनही कॉलेजातील विद्यार्थी म्हणून दाखविला जातो; पण टीव्ही मालिकेत तसं दाखविणं शक्य नसतं. तसंच तरुण कलाकारांना कमी वेतनावर कामावर ठेवता येतं. पण या स्पर्धेत टिकून राहण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे कलाकाराने अगदी तंदुरुस्त राहिलं पाहिजे. मी हा मंत्र काटेकोरपणे पाळत असल्याने मला अजूनही कोणी टीव्हीवर पित्याची भूमिका देऊ केलेली नाही.”आपल्या मुलाच्या पत्नीत पाच विशेष गुण असावेत, अशी इच्छा बाळगणा-या आईला पाच सुना मिळतात आणि त्यामुळे उदभविणार््या पेचप्रसंगांचे चित्रण ‘क्या हाल, मिस्टर पांचाल?’ या मालिकेत विनोदी पध्दतीने केले आहे. आपल्या अतिआग्रही स्वभावामुळे सासूला कसे अनेक त्रास सोसावे लागतात, हे दर्शविणारी ही मालिका आहे. कधी कधी गरजेपेक्षा अधिक गोष्टींची मागणी ही संकटांना निमंत्रण देते, हे या मालिकेत हलक्याफुलक्या पध्दतीने दाखविले आहे. आपली सून अगदी परिपूर्ण आणि निर्दोष असावी, याची हाव धरणे अयोग्य असून आपल्या सुनांकडून सासवांनी अवाजवी अपेक्षा करू नयेत, असा संदेश ही मालिका देते.क्या हाल मिस्टर पांचाल? या मालिकेत एक आई आपल्या मुलाला सर्वगुणसंपन्न पत्नी मिळावी यासाठी देवाकडे नवस करते. पण एका मुलीत सगळेच गुण नसल्याने देवाच्या आशीर्वादामुळे तिच्या मुलाचे लग्न पाच मुलींशी होते आणि तिथून सुरू होते या मालिकेत खरी धमाल-मस्ती.या मालिकेची निर्मिती विपुल डी शाह यांनी केली असून या मालिकेत कांचन गुप्ता आणि मनिंदर सिंग यांची मुख्य भूमिका आहे.