विनोदी म्हणा, नकारात्मक म्हणा, गंभीर म्हणा अशा वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) यांची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. हसऱ्या आणि बोलक्या चेहऱ्याच्या सुप्रिया सध्या त्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री सुप्रिया पाठारे आज त्यांचा पन्नासावा वाढदिवस साजरा करत आहेत.अर्थात इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. चार भावंडात सगळ्यात थोरल्या असल्याने सुप्रियांनी कधीकाळी चक्क लोकांच्या घरची भांडी घासली.
लोकप्रिय अभिनेत्री अर्चना नेवरेकर ही सुप्रिया यांची धाकटी बहिण. अर्चना नाटकांत काम करायच्या. पण सुप्रियांच्या मनात कधीच अभिनयात यायचा विचारही आला नव्हता. मात्र अर्चना यांच्यासोबत ‘बॉडीगार्ड’ म्हणून सुप्रिया सेटवर जायला लागल्या आणि इथून त्यांना अभिनयाची गोडी लागली. त्याआधी मात्र सुप्रिया यांनी रस्त्यावर चणे विकलेत, कधी दुधाच्या बाटल्या घरोघरी पोहोचवायचं काम केलं. घरची परिस्थिती बेताची होती.घरची परिस्थिती बेताची होती. चारही भावंडात मोठ्या असल्यानं सुप्रियावर घराची मोठी जबाबदारी होती.
डान्स क्लासची फी भरायला भांडी घासली...मला नृत्याची फार आवड होती. मला भरतनाट्यम डान्स क्लास लावायचाय, असं मी आईला सांगितलं. फी होती 70 रूपये. पण आईला ती परवडणारी नव्हती.अखेर अर्चना पालेकर यांच्याकडे भरतनाट्यम शिकण्यासाठी मी त्यांच्या मैत्रिणीकडे भांडी घासायचं काम सुरू केलं. त्याचे मला 100 रुपये मिळायचे. क्लासचे 70 रुपये भरून उरलेले 30 रुपये मी आईला द्यायचे. मी आणि माझी आई तेव्हा 18 घरांची भांडी घासायच्या. 18 घरची भांडी घासून मी थकून जायची. इतकी की डान्स क्लासला गेल्यावर एनर्जीचं पुरायची नाही. म्हणून तो डान्स क्लास मी फार काही गंभीरपणे केला नाही. पण डान्स शिकण्याची इच्छा मी नक्की पूर्ण करेन.