Join us

पन्नाशी उलटल्यानंतर मराठी अभिनेत्याची आई शिकली गाडी, म्हणाला- "जेव्हा गाडी शिकण्याचं वय होतं तेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 10:25 AM

"माझी आई पन्नाशीनंतर गाडी चालवायला शिकली", प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतील अप्पू आणि शशांक ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेत शशांकची भूमिका साकारून अभिनेता चेतन वडनेरे घराघरात पोहोचला. चेतन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्याने त्याच्या आईचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

या व्हिडिओत चेतनची आई गाडी चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. चेतन आईला गाडी चालवण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत चेतनने आईसाठी खास पोस्ट लिहिली आहे. वयाच्या पन्नाशीनंतर गाडी चालवायला शिकलेल्या आईचं चेतनने कौतुक केलं आहे. 

माझी आई आत्ता पन्नाशीनंतर गाडी चालवायला शिकली. अजून चार चाकी चालवणं बाकी आहे, सुरुवात मात्र दुचाकीने केली आहे. खरं तर जेव्हा गाडी शिकण्याचं वय होतं तेव्हा जवळ गाडी नव्हती आणि आता गाडी आहे तर शिकण्याचं वय गेलं असं तिला उगाच वाटत होतं. पण शिकायला वयाची काही अट नसते. 

 

आपल्या आयांच्या अनेक आवडीनिवडी, नवीन काहीतरी शिकणं-फिरणं या गोष्टी त्या कायम पुढे ढकलत असतात...नंतर करू - नंतर करू असं म्हणत म्हणत त्या करायच्या राहून जातात. तुमच्या आईची एखादी इच्छा, आवड असेल तर त्यांना त्या जोपासायला सांगा. कसं आहे वेळ निघत नसतो तो काढावा लागतो. Happy mother's day ( खरंतर हे Day's पाळणं मला पटत नाही, मला उगाच ते फार औपचारिक वाटतं.) तरी हा व्हिडिओ टाकण्यासाठी या दिवसाचं औचित्य साधलं बास.

चेतनच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं आणि त्याच्या आईचं कौतुक केलं आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकार