Join us

मराठी मालिकेत काम करणारा हा अभिनेता बनला अट्टल चोर, चोरल्या तब्बल २२ बाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 11:42 AM

मराठी मालिकांमध्ये काम करणारा हा अभिनेता चक्क सीरियल चोर निघाला आहे. त्याने एक-दोन नव्हे तब्बल २२ बाईक चोरी केल्याचे समोर आले आहे.

आजवर तुम्ही चोरीच्या बऱ्याच घटना पहिल्या असतील. पण नुकतीच समोर आलेली एक चोरीची घटना तुम्हालाही चक्क करेल कारण हा चोर एक अभिनेता आहे. मराठी मालिकांमध्ये काम करणारा हा अभिनेता चक्क सीरियल चोर निघालाय. बऱ्याच मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची तसेच लहान सहान भूमिका साकारणारा हा आहे अभिनेता सुनील चौधरी. सुनीलने एक-दोन नव्हे तब्बल २२ बाईक चोरी केल्याचं समोर आलय.

कोविड काळात चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण मोठ्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आलं होतं. याचा फटका सुनीललाही बसला. पैशांची चणचण भासल्यामुळं त्यानं मुंबईसह आजुबाजूच्या परिसरातून त्यानं बाईक चोरण्यास सुरुवात केली. निर्जन ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी तो चोरायचा आणि जळगाव परिसरात साधारण १० ते १५ हजार रुपयांना विकायचा. सुनीलचे हे कृत्य तेव्हा उघडकीस आलं जेव्हा मुलुंडमधील गव्हाणपाडा परिसरात राहणाऱ्या अरविंद उकर्डे यांची बाईक चोरीला गेली. सदर प्रकरणांवर नवघर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

पोलीस तपास सुरु झाला आणि त्यादरम्यानच काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले. त्यातूनच सुनील चौधरीचा ठावठिकाणा मिळाला. पोलिसांनी त्याला ठाणे परिसरातून ताब्यात घेतले आणि यानंतरच्या चौकशीमध्ये त्यानं आपण २२ बाईक चोरल्याचा गुन्हा कबूल केला.