Join us

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार देवाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:59 IST

Savalyanchi Janu Savali : 'सावळ्याची जणू सावली' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेतील सावलीने आपल्या सोज्वळ मन आणि साधेपणाने रसिकांची मने जिंकली आहे. आता या मालिकेत एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे.

झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' (Savalyanchi Janu Savali) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेतील सावलीने आपल्या सोज्वळ मन आणि साधेपणाने रसिकांची मने जिंकली आहे. आता या मालिकेत एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे, ते म्हणजे देवाचं. ही भूमिका साकारणार आहे निषाद भोईर (Nishad Bhoir).

सावलीसोबत लग्न झाल्यामुळे सारंग कायम निराशेच्या छायेत वावरत होता. पण जसा तो सावलीच्या माहेरी गेला तसा तो सावलीला जवळून ओळखू लागला. गावातील लोक सावलीला आदर देतात, तिच्या कामाचे कौतुक करतात ते पाहून सारंगच्याही मनात तिच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत. सावलीला अजून त्याने पत्नी म्हणून स्वीकारले नसले तरी तिच्याबद्दल आता त्याला आपलेपणा वाटू लागला आहे. दरम्यान आता सारंगवर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. याची चाहूल सावलीला लागली असताना ती मध्येच गाणे सोडून सारंगच्या मदतीला जाण्यासाठी तयार होते. पण भैरवीला दिलेल्या वचनामुळे ती हतबल होते. आता विठुरायानेच सारंगला वाचवावे म्हणून ती त्याचा धावा करते. तेव्हा देवा नावाची व्यक्ती सारंगच्या मदतीला धावून येते. हा देवा पोलीस असून ही भूमिका कोण साकारणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. देवाची भूमिका अभिनेता निषाद भोईर साकारतो आहे.

कोण आहे निषाद भोईर?निषाद भोईरने दख्खनचा राजा जोतिबा, निवेदिता माझी ताई आणि आशीर्वाद तुझा एकविरा आई या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच रंगभूमीवर दाखल झालेल्या पुरुष या नाटकातही तो काम करत आहे. आता महेश कोठारे यांच्या सावळ्याची जणू सावली मालिकेत तो देवाची भूमिका साकारत आहे. हा देवा सावली आणि सारंगच्या आयुष्यात येऊन त्यांना आणखी जवळ आणणार की त्यांच्या नात्यात दुरावा आणणार हे पाहणे कमालीचे ठरेल.