Join us

'चला हवा येऊ द्या' शोमधील हा कलाकार एकेकाळी चालवायचा पानटपरी, आता आहे विनोदाचा बादशाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 6:50 PM

Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' शोमधील या कलाकाराने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) गेल्या कित्येक वर्षांपासून रसिकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या शोमधील सर्व कलाकार आपल्या विनोदी कौशल्याने रसिकांना पोट धरून हसायला भाग पडतात. या शोमधील सर्वच कलाकारांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. या शोमधील सर्वांचा लाडका विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam) एकेकाळी पानटपरी चालवायचा हे फार कमी लोकांना माहित आहे. 

भाऊ कदम म्हणजेच भालचंद पांडुरंग कदमचे बालपण मुंबईतील वडाळा परिसरातील बीपीटी चाळीत गेले. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले. भाऊचा स्वभाव बालपणापासूनच अगदी शांत आणि मितभाषी होता. वडिलांच्या अकाली निधनानंतर भाऊ उर्वरित कुटुंबासह डोंबिवली येथे स्थायिक झाले. भाऊने सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी मतदार मोजणीचे काम सुरु केले होते, परंतु त्यात घर खर्च भागत नसल्याने त्याने भावाची मदत घेऊन पानाची टपरी सुरु केली.  

भाऊ कदम गेल्या १५ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. या कारकिर्दीत सुमारे ५०० पेक्षा जास्त नाटकांमध्ये त्याने विविधांगी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. सुरुवातीच्या काळात भाऊला अत्यंत छोट्या भूमिका मिळत होते. त्यामुळे त्याला पुरेसे पैसे मिळायचे नाही. म्हणून भाऊने अभिनयाला रामराम करण्याचाही विचार केला होता. मात्र याच काळात विजय निकम यांनी भाऊला 'जाऊ तिथे खाऊ' या नाटकात मुख्य भूमिका दिली. ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरली. 

या संधीचं केलं सोनं....त्यानंतर भाऊ कदमने 'फु बाई फू' या कार्यक्रमाची दोन वेळा आलेली ऑफर नाकारली होती. त्याला आपला स्वभाव लाजाळू असल्यामुळे हे काम आपल्याला जमणार नाही असे वाटायचे. तिसऱ्यांदा आलेली ऑफर भाऊने स्वीकारली आणि या संधीचे सोनेदेखील केले. तो 'फु बाई फू' च्या सहाव्या पर्वाचा विजेता ठरला. तसेच भाऊने मराठी चित्रपटातही काम केले आहे. त्यात टाइमपास २, टाइम पास, सांगतो ऐका, मिस मॅच, पुणे विरुद्ध बिहार, नारबाची वाडी, कोकणस्थ, मस्त चाललंय आमचं, बाळकडू, खारी बिस्किट व नशीबवान या चित्रपटात तो झळकला आहे. तसेच, त्याने फरारी की सवारी या चित्रपटातही एक छोटीशी भूमिका केली होती. नुकताच त्याचा प्रदर्शित झालेला पांडू चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात भाऊने पांडू हवालदार ही प्रमुख भूमिका साकारली होती.

टॅग्स :भाऊ कदमचला हवा येऊ द्या