नव्वदच्या काळात छोट्या पडद्यावर अनेक दर्जेदार मालिकांची निर्मिती झाली. या मालिकांच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'आभाळमाया' (Abhalmaya Serial). या मालिकेने तर त्या काळातील प्रत्येक प्रेक्षकाला वेड लावले होते. ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजली होती. आभाळमाया मालिकेचे अनेक किस्से आजही ऐकायला मिळतात. अलिकडेच अभिनेत्री, लेखिका मुग्धा गोडबोले(Mugdha Godbole)ने आभाळमाया या मालिकेसंदर्भात एक किस्सा सांगितला.
आभाळामाया मालिकेत मुग्धा गोडबोले देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. नुकतेच द के क्राफ्ट या युट्युब चॅनेलला या मालिकेच्या संपूर्ण टीमने मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी मालिकेतील एक किस्सा सांगितला. मुग्धा गोडबोले म्हणाली की, आभाळामायाची कथा ही रतनबाई कॉलेजमधील प्राध्यापक सुधा जोशी या शिक्षिकेभोवती फिरते, ज्यांच्या कुटुंबात तिचा पती शरद जो एक प्राध्यापक देखील आहे आणि त्यांना दोन मुली आकांशा आणि अनुष्का आहेत. शरद जेव्हा दुसऱ्या प्रोफेसर चित्राच्या प्रेमात पडतो जिची त्याला चिंगी नावाची एक मुलगी आहे, तेव्हा कुटुंबात तेढ निर्माण होते. पण त्यावेळी मालिकेत सुधा जोशी यांच्या आयुष्यात देखील एक पुरुष आणावा अशी पद्धतीची कल्पना सुचली होती.
म्हणून निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
पुढे तिने सांगितले की, त्यासाठी काही सीन शूट झाले होते, जे सचिन खेडेकर यांनी केले होते. पण मालिकेच्या निर्मात्यांना एक शंका आली. अर्थात त्यावेळी सोशल मीडिया नव्हते आणि मालिकेचे प्रोमोही काही नसायचे. पण शिवाजी पार्कवर जाताना लोकांच्या भावना काय आहेत, हे लक्षात आले. त्यानंतर जाणवले की जी लोकांच्या मनात एक आदर्श व्यक्तिरेखा आहे, त्या स्त्रीच्या आयुष्यात दुसरा पुरुष आलेला लोकांना आवडणार नाही. त्यामुळे तेव्हा ते पाऊल उचलले नाही गेले.