छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe lay karte) . उत्तम कथानकामुळे लोकप्रिय ठरत असलेल्या या मालिकेतील काही भूमिकाही सोशल मीडियावर चांगल्याच गाजत आहेत. त्यातलीच एक भूमिका म्हणजे अनिरुद्ध. अभिनेता मिलिंद गवळी ही भूमिका साकारत असून अनेकदा ते सोशल मीडियावर या भूमिकेविषयी आणि मालिकेतील इतर कलाकारांविषयी त्यांची मतं मांडत असतात. मात्र, यावेळी त्यांनी त्यांच्या लोकप्रियतेचं श्रेय या मालिकेतील एका कलाकाराला दिलं आहे.
मिलिंद गवळी यांनी अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट खास अभिनेता मयूर खांडगे याच्यासाठी आहे. या मालिकेत मयूरने संजनाच्या नवऱ्याची म्हणजेच शेखरची भूमिका साकारली आहे. याच शेखरसाठी अनिरुद्धने खास पोस्ट लिहिली आहे. शेखर म्हणजेच मयूर सेटवर असल्यानंतर एकंदरीत येथील वातावरण कसं प्रफुल्लित होतं हे त्याने सांगितलं आहे.
"मयूर खांडगे..ज्याच्या येण्याने चैतन्य येतं सेटवर, तो आला की वातावरणच बदल. त्याला चिडवायला, त्याला त्रास द्यायला, त्याला छळायला सगळ्यांनाच आवडतं. नेहमी हसतमुख आणि सतत काहीतरी घडत असतं तो आजूबाजूला असला की, सीन विषयी चर्चा असते. सीनमध्ये त्याला अजून काय काय करता येईल याचा सतत मनन चिंतन चालू असतं. बरं त्याचे सीन काही साधे सरळ सोपे नसतात शेखरचे, तो आला म्हणजे तो भडाभडा भडाभडा बोलणार,खूप बोलणार. बरं मुग्धा त्याची वाक्य पण अफलातून गमतीशीर मजा आणणारी लिहिते.आणि, तो ती वाक्य खूप छान पद्धतीने घेतो पण त्याच्याबरोबर शूटिंग करत असताना मजाच येते. आई कुठे काय करते या सिरीयलमध्ये मयूर खांडगे हा एकमेव असा कलाकार आहे, ज्यांनी मुग्धाची वाक्य अनेक वेळा बदली आहेत", असं मिलिंद गवळी म्हणाले.
पुढे ते म्हणतात, ''बरं त्याने काही काही शब्द त्याच्या मनाची जी काय घेतलीये किंवा टाकली आहेत ते शब्द नंतर मुग्धाने वापरायला सुरुवात केली. त्यातलाच एक भन्नाट शब्द माझ्यासाठी म्हणजेच अनिरुद्धसाठी त्यांनी पहिल्याच सीनमध्ये वापरला, तो म्हणजे अन्या देशमुख. अनिरुद्धला अन्या म्हणाला त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला", अशी पोस्ट मिलिंद गवळी यांनी लिहिली आहे.