Join us

'तुला जपणार आहे'मध्ये फोटोवर हार पाहून प्रतीक्षा शिवणकरच्या घरातल्यांची ही होती रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:48 IST

Tula Japnar Aahe Serial : 'तुला जपणार आहे' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत प्रतीक्षा शिवणकरने अंबिकाची भूमिका साकारली आहे.

झी मराठीवर 'तुला जपणार आहे' (Tula Japnar Aahe Serial) ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत प्रतीक्षा शिवणकर(Pratiksha Shiwankar)ने अंबिकाची भूमिका साकारली आहे. प्रतीक्षाने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी प्रतीक्षाने मालिकेत तिच्या फोटोवर हार पाहिल्यावर घरातल्यांची काय रिअ‍ॅक्शन होती, हेदेखील सांगितले. 

मालिकेबद्दल प्रतीक्षा शिवणकर म्हणाली की, 'तुला जपणार आहे' मालिकेत अंबिकाच्या भूमिकेतून मी तुम्हा सर्वांसमोर एका नव्या रूपात भेटीस  येणार आहे. जसं तुम्ही प्रोमोमध्ये पाहिले आहे. अंबिका हयात नसतानाही आपल्या मुलीच्या रक्षणासाठी ती परत आली आहे. अंबिकाचा भूतकाळ असा आहे की ती एका अनाथाश्रमात वाढली आहे. पुढे जाऊन तिचं एका मोठ्या घराण्यात लग्न होत तिचा सुखाचा संसार सुरु होतो. पण तिच्या सुखी संसाराला कोणाचीतरी नजर लागते, तिच्यासोबत एक दुर्घटना घडते आणि ती  जगातून निघून जाते. अंबिकाला सतत आपल्या मुलीची चिंता आहे की तिच्यावर काही संकट आहे. ही गोष्ट एका आईच्या मातृत्वाची आणि तिच्या मुलीच्या प्रेमाची आणि रक्षणाची आहे. ही मालिका इतर मालिकांपेक्षा खूप वेगळी आहे. 

ती पुढे म्हणाली की, माझ्यासाठी एक कलाकार म्हणून ही भूमिका आव्हानात्मक आहे कारण जेव्हा आपण भूताची भूमिका करत असतो तेव्हा आपल्या शरीरातून कोणी येत-जात आहे ते निभावणं आणि शूट करण्याची पद्धतही वेगळी आहे, तेव्हा मज्जा ही येत आहे. खूप काही शिकायला मिळत आहे. अंबिकाच्या भूमिकेसाठी माझी रीतसर ऑडिशन झाली. अंबिकाच्या भूमिकेसाठी मला आयरिस प्रॉडक्शनमधून कॉल आला. मी दिलेली ऑडिशन प्रॉडक्शन आणि चॅनेलने पहिली त्यांना ती आवडली आणि माझं सिलेक्शन झालं. झी मराठी सोबत माझी ही पहिलीच मालिका आहे. एक चांगलं प्रॉडक्शन आणि चांगल्या वाहिनी सोबत काम करायला मिळणं याचा मला आनंद आहे. जितका आनंद मला झाला तेवढाच आनंद माझ्या घरच्यांना देखील झाला. मलाच थोडं टेंशन आले होते की घरचे कसे रिअ‍ॅक्ट होतील, कारण अंबिकाच पात्र मालिकेत मरणार आहे आणि तिच्या फोटोला हार घातला जाणार आहे. पण जेव्हा त्यांनी प्रोमो पाहिला ते ओके होते. उलट घरातल्यानीच मला समजावले. प्रोमो पाहून सगळ्यांनी प्रचंड छान रिस्पॉन्स दिला आहे. आता जबाबदारी वाढली आहे अजून छान काम करायचे आहे.