Join us

'पुन्हा कर्तव्य आहे' फेम अक्षय म्हात्रेसाठी यंदाचा गणेशोत्सव आहे खूप खास, म्हणाला - "लग्नानंतरचा पहिला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 10:11 AM

Akshay Mhatre : यंदाचा गणेशोत्सव 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील आकाश म्हणजेच अभिनेता अक्षय म्हात्रेसाठी खूप खास आहे.

सध्या सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनामुळे जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. कलाकारांच्या आणि मालिकेच्या सेटवर बाप्पाचं आगमन झालं आहे. यंदाचा गणेशोत्सव 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील आकाश म्हणजेच अभिनेता अक्षय म्हात्रेसाठी खूप खास आहे. कारण हा त्याचा लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव आहे. त्यामुळे त्याची पत्नीदेखील खूप उत्सुक आहे. 

अक्षय म्हात्रे म्हणाला की, "बाप्पाची स्थापना आधी आमच्या गावी अलिबागला व्हायची आणि आम्ही दरवर्षी गावी जायचो. पण जसं आजी-आजोबांचं वय होत गेले तसं गावी प्रवास करणं तिथे जाऊन तयारी कारण थोडं कठीण होत गेले. कोविडच्या काळात आम्ही ठरवले की गणपती बाप्पाला मुंबईच्या घरी स्थापित करायचं. तेव्हा पासून आम्ही गणेश स्थापना आमच्या नेरुळच्या घरी करायला सुरुवात सुरवात केली. तो पुढे म्हणाला की, हे आमचं ४ वर्ष आहे. हे वर्ष खास आहे कारण लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव आहे. मी तर खूप खुश आणि उत्साही आहेच पण माझी बायको माझ्यापेक्षाही उत्सुक आहे. तिची तयारी सुरु होती. आमची रोज चर्चा होते सजावटीवर, नेवेद्य काय ठेवायचा यावर आणि तिने मला आरती शिकवायला सांगितली आहे. तर खूप उत्साहाचा माहोल आहे घरी. 

आमच्या घरी बाप्पा लालबागच्या गणपतीच्या रूपात येतात. लहानच मूर्ती असते पण रूप त्याच लालबागच्या राजाचे असतं. मला गहेशोत्सवात जी गोष्ट आवडते ती म्हणजे सगळा मित्र परिवार एकत्र येतो. आमच्या घरी दीड दिवस गणपती असतो आणि त्या दिवसात झोप हा प्रकारचं नसतो. दिवसभर कोणतरी दर्शन करायला येतच असते. घर एकदम गजबजलेलं असते. पाहुण्यांसोबत गप्पा-टप्पा,  खेळ- खेळले जातात, गाणी गायली जातात. मला मोदक खायला प्रचंड आवडतात तूप घालून तर त्याची मज्जा वेगळीच आहे. पूर्ण धमाल वातावरण असत घरी, असे अक्षयने सांगितले.आमच्या 'पुन्हा कर्तव्य आहे' च्या सेटवर म्हणजे मालिकेमध्ये ही गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे खूप काही घडणार आहे या दरम्यान मालिकेत. सेटवर पण उत्साहाचा माहोल असणार आहे. तर ती ही वेगळी मज्जा असणार आहे, असेही त्याने म्हटले.