सिनेइंडस्ट्रीत सध्या लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी बोहल्यावर चढत आहेत. नुकतंच मराठमोळा अभिनेता प्रथमेश परबचा शुभविवाह पार पडला. अभिनेत्री पूजा सावंतचीही लगीनघाई सुरू आहे. याबरोबरच आता तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेही विवाहबंधनात अडकणार आहेत. गुपचूप साखरपुडा केल्यानंतर तितीक्षा आणि सिद्धार्थ बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज आहेत.
तितीक्षा आणि सिद्धार्थने कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत २५ फेब्रुवारीला साखरपुडा केला. त्यानंतर आता त्यांची लगीनघाई सुरू झाली आहे. साखरपुड्यानंतर तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकताच त्यांचा हळदी समारंभही पार पडला. याचे फोटो समोर आले आहेत. तितीक्षाने हळदीसाठी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. त्यांच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सिद्धार्थने हळदी समारंभात वडिलांबरोबर खास डान्सही केला. याचा व्हिडिओही समोर आला आहे. तितीक्षा-सिद्धार्थच्या हळदीला रसिका सुनील आणि ऋतुजा बागवेनेही हजेरी लावली होती. २६ फेब्रुवारीला तितीक्षा आणि सिद्धार्थ लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
तितीक्षा आणि सिद्धार्थने 'तू अशी जवळी राहा' मालिकेत एकत्र काम केलं होतं. सध्या तितीक्षा 'सातव्या मुलीची सातवी गोष्ट' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सिद्धार्थने मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. अजय देवगणच्या 'दृश्यम २' या सिनेमातही तो झळकला होता.