मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे (Titeeksha Tawade). काही दिवसांपूर्वीच तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे ही जोडी सध्या चर्चेत आहे. यामध्येच आता लग्नानंतर तितीक्षा आणि सिद्धार्थ होळी हा पहिला सण साजरा करणार आहेत. म्हणूनच, तितीक्षाने तिचा होळी आणि रंगपंचमीचा प्लॅन सांगितला आहे.
तितीक्षा लग्नानंतर पहिली होळी साजरी करणार असल्यामुळे ती खूप उत्साही आहे. यामध्येच जर तिला सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या शूटमधून वेळ मिळाला तर ती थेट नाशिकला जाऊन तिची होळी साजरी करणार आहे.
"लग्नानंतरचा माझा पहिला सण आहे तर उत्सुकता तर आहेच. शूटिंगमधून वेळ काढू शकले तर नाशिकला जाऊन होळी साजरी करण्याचा विचार आहे. नाशिकला वेगळ्या तारखेला धुळवड साजरी केली जाते. तिथे पेशवे कालीन रहाड आहेत रहाड. म्हणजे कुंडासारखं असत ज्या वर्षभर बुजवल्या जातात पण होळीच्या दिवशी त्याची पूजा करून ते उघडले जातात त्यामध्ये पाणी आणि खूप सारे रंग मिसळले जातात आणि त्यात मग सगळे जण उडी मारून धुलिवंदन खेळतात. ही खूप जुनी प्रथा आहे, जी बघायची इच्छा आहे, असं तितीक्षा म्हणाली.
पुढे ती म्हणते, मी तितकीशी होळी खेळत नाही कारण कामामुळे वेळ कमी मिळायचा. त्यामुळे होळी खेळणं कमी होत गेलं. पण जेव्हा मी ठरवून होळी खेळायला जाते तेव्हा त्वचेवर आणि केसांना खोबरेल तेल लावून जाते. हे केल्यानी रंग लगेच निघतो आणि कमी त्रास होतो. मी नेहमी नैसर्गिक रंगानी होळी खेळायचा प्रयत्न करते."