स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ या मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकवर्गातून भरभरुन दाद मिळताना दिसतेय. अश्विनी शेंडे-बगवाडकरच्या लेखणीतून हे शीर्षकगीत तयार झालं असून नीलेश मोहरीरने हे गाणं संगीतबद्ध केलंय. टिकोजीराव ऐदी... आड येते ही छत्रीवाली असे धमाल शब्द असलेल्या या गाण्याला तरुणाईकडून पसंती मिळताना दिसतेय.
स्टार प्रवाहची शीर्षकगीतं नेहमीच खास असतात. अग्निहोत्र, पुढचं पाऊल, गोठ, नकुशी, नकळत सारे घडले, ललित २०५, विठुमाऊली अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. या मालिकांची श्रवणीय आणि अर्थपूर्ण असलेली गाणी आजवर हिट झाली आहेत. या यादीत आता ‘छत्रीवाली’ या मालिकेच्या टायटल साँगचीही भर पडली आहे. नायक आणि नायिकेतल्या लव्ह-हेट नात्याचं नेमकेपणानं वर्णन आणि चित्रण या गाण्यातून करण्यात आलं आहे.
या गाण्याविषयी सांगताना नीलेश मोहरीर म्हणाला, 'मालिकेच्या नावातच खूप गंमत आहे. बरेचदा मालिकेच्या नावात गाण्याचा पदर दडलेला असतो. अश्विनी शेंडे-बगवाडकरने खूप उत्तम पद्धतीनं हे टायटल साँग लिहिलं आहे. तसंच बेला शेंडे आणि जयदीप बगवाडकरनंही तितक्याच हलक्याफुलक्या पद्धतीनं ते गायलंय. या गाण्यातून नायक-नायिकेचा स्वभाव, व्यक्तिरेखा नेमकेपणाने व्यक्त होते. माझ्या आजपर्यंतच्या गाण्यांमधलं हे टायटल साँग खूपच वेगळं आहे.
छत्रीवाली या मालिकेत संकेत पाठक आणि नम्रता प्रधान ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. संकेत पाठकने या पूर्वी स्टार प्रवाहच्याच दुहेरी या लोकप्रिय मालिकेत दुष्यंत ही व्यक्तिरेखा साकारली होती तर नम्रताची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेच्या प्रोमोजनी सोशल मीडियामध्ये उत्सुकता निर्माण केली होती. या मालिकेचा प्रोमो पाहून या मालिकेचे नाव छत्रीवाली का ठेवले आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे.