‘लागीरं झालं जी’ या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला जातो आहे. सैनिकाच्या जीवनावर आधारित असलेल्या या मालिकेत एक स्तुत्य उपक्रम राबवला जाणार आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहीद परिवाराचा सन्मान सोहळा पाहायला मिळणार आहे.
सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी राज्यांच्या राजधानीचा जिल्हा, शूर मावळ्यांचा आणि लढवय्या फौजींचा जिल्हा आहे. हा भारतातील एकमेव जिल्हा आहे ज्यातील सर्वात जास्त नवजवान सैन्यात आहेत. म्हणूनच सातारकरांच्या गळ्यातील ताईत असलेल्या या मालिकेला आबालवृद्ध प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि देत ही राहतील यात शंका नाही. निर्माती व लेखकाने लोक आग्रहाखातर 'रिल हीरो बरोबरच रियल हिरो' सोबत घेऊन हा उपक्रम मालिकेत सादर करणार आहेत. या वेळी सहभागी वीरमाता व वीरपत्नी तसेच शहीद पुत्र यांच्या सोबत चित्रित झालेला भाग आज दाखवला जाणार आहे आणि भागाचे विशेष आकर्षण आहे शहीद जवान गणेश किसन ढवळे यांचा पुत्र समर्थ जो त्याचे वडील शहीद झाले तेव्हा अवघ्या पाच महिन्यांचा होता. सोबत वीरमाता आणि वीरपत्नी सुद्धा आहेत. यात सातारा जिल्ह्यातील २०१७-१८ या वर्षात शहीद झालेले शहीद परीवारांचा समावेश असणार आहे. फक्त २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन दिवशी इतर नागरिकांसारखं देशभक्तीचे नारे न लावता लगीरं झालं जी या मालिकेने राबवलेला हा उपक्रम खरंच वाखाणण्याजोगा आहे.