Join us

'तुला पाहते रे' ही मालिका या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 2:18 PM

'तुला पाहते रे' या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा 'झी मराठी'वर पुनरागमन करत छोट्या पडद्यावर आपली जादू दाखवणार आहे. या मालिकेतून पुण्याची गायत्री दातार ही नवोदित अभिनेत्री छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

झी मराठी ही वाहिनी नेहमीच विविध आणि रंजक विषयांची योग्यरीत्या हाताळणी आणि सादरीकरणातील नावीन्याने महाराष्ट्रातील तमाम जनतेचं गेल्या २० वर्षांपासून भरभरून मनोरंजन करत आली आहे. वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी घेऊन झी मराठी वेगळ्या धाटणीची मालिका प्रेक्षकांसाठी सादर करत आहे. 'तुला पाहते रे' या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा 'झी मराठी'वर पुनरागमन करत छोट्या पडद्यावर आपली जादू दाखवणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर तो टीव्ही मालिकेकडे परततो आहे. अवघाची संसार,रिमझिम, 'का रे दुरावा' यासारख्या मालिकेत सुबोधच्या भूमिकेला रसिकांनी भरघोस पसंती दिली होती.' ‘तुझं माझं ब्रेकअप’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी 'तुला पाहते रे' ही नवी मालिका १३ ऑगस्ट पासून रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

वय विसरायला लावतं ते खरं प्रेम असं म्हणणारी 'तुला पाहते रे' ही मालिका आहे ईशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची. विक्रम सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी इशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे. हे दोघे कसे भेटतात, त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचं प्रेमात कधी रुपांतर होतं हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल. मालिकेचे सर्व प्रोमो पाहता मालिकेत भव्यता दिसून येते. या मालिकेतून पुण्याची गायत्री दातार ही नवोदित अभिनेत्री छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तिच्या या पदार्पणाविषयी बोलताना गायत्री सांगते, "‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेतून मी पदार्पण करत आहे आणि पदार्पणातच सुबोध भावे सारख्या दिग्गज कलाकारासोबत काम करायची सुवर्णसंधी मिळाली याचा मला आनंद आहे. मी या मालिकेत इशा या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीचं पात्र साकारते आहे जी खूप मेहनती आहे. इशा ही तिच्या बाबांच्या खूप जवळ आहे. मी अाशा करते की, रसिकांना माझी व्यक्तिरेखा नक्कीच आवडेल."

टॅग्स :झी मराठीसुबोध भावे तुला पाहते रे