Join us  

'तुमास्नी पाहिलं की विषय नुसता हार्ड होतोय'; अक्षरा देणार अधिपती समोर प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 3:29 PM

Tula Shikvin Changalach Dhada: अधिपतीचा पती म्हणून स्वीकार करण्यास तयार नसलेली अक्षरा चक्क त्याच्या प्रेमात पडली आहे.

छोट्या पडद्यावर सध्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका चांगलीच गाजत आहे. कविता लाड-मेढेकर, हृषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका पहिल्या दिवसापासून लोकप्रिय ठरली आहे. यामध्येच आता मालिकेत एक ट्विस्ट आला आहे. अधिपतीचा पती म्हणून स्वीकार करण्यास तयार नसलेली अक्षरा चक्क त्याच्या प्रेमात पडली आहे. इतकंच नाही तर तिने जाहीरपणे त्याच्यासमोर प्रेमाची कबुली दिली आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अक्षरा अधिपतीसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देत असल्याचं दिसून येतं. गेल्या कित्येक दिवसांपासून अक्षरा अधिपतीसमोर तिचं प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न करत आहे. या सगळ्यात अधिपतीचे वडील सुद्धा तिला मदत करत आहेत. परंतु, दरवेळी अक्षरा तिच्या प्रयत्नात अपयशी ठरते. 

दरम्यान, अक्षरा तिचं प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न करत असूनही अधिपतीला मात्र तिचे संकेत कळत नाहीत. शेवटी वैतागलेली अक्षरा अधिपतीच्याच भाषेत तिच्या प्रेमाची कबुली देते. 'तुमास्नी पाहिलं की विषय नुसता हार्ड होतोय' असं म्हणत अक्षरा तिचं प्रेम व्यक्त करते. विशेष म्हणजे अक्षराचं आपल्यावर प्रेम असल्याचं कळल्यानंतर अधिपती भारावून जातो आणि नकळतपणे त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आता अक्षराने तिच्या प्रेमाची कबुली दिल्याचं भुवनेश्वरीला कळल्यानंतर काय होणार? अधिपती-अक्षराला दूर करण्यात ती यशस्वी होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारशिवानी रांगोळेकविता लाड