झी मराठीवर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changalach Dhada). शिवानी रांगोळे (shivani rangole) , हृषिकेश शेलार (hrishikesh shelar) आणि कविता मेढेकर (kavita medhekar) यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका पहिल्या दिवसापासून लोकप्रिय ठरत आहे. आतापर्यंत अक्षराच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. मनाविरुद्ध लग्न करुन सुद्धा ती सूर्यवंशींच्या कुटुंबात रुळण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्येच तिचा भुवनेश्वरी, अधिपतीची खरी आई नसल्याचं सत्य समजलं आहे. या सत्यानंतर आता तिला भुवनेश्वरीची आणखी एक बाजू उलगडणार आहे.
भुवनेश्वरी, अधिपतीची खरी आई नसल्याचं सत्य कोणालाही समजू नये, सुर्यवंशींची सगळी संपत्ती आपल्या नावे करता यावी यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून ती चारुहास सरांवर चुकीचे वैद्यकीय उपचार करत होती. परंतु, अक्षरा एका चांगल्या डॉक्टरांच्या मदतीने चारुहास सरांवर योग्य उपचार करुन त्यांना बरं करते. चारुहास सरांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यावर ते भुवनेश्वरीचं सत्य अक्षराला सांगतात ज्यामुळे ती गोंधळून जाते. परंतु, चारुहास सरांची बाजू ऐकल्यानंतर आता ती भुवनेश्वरीची बाजू ऐकणार आहे.
अक्षरा आता भुवनेश्वरीचा प्रत्येक शब्द ऐकत नसून तिने पुन्हा एकदा शाळेत जायला सुरुवात केली आहे. मात्र, अक्षराला शाळेत घेतलं तर तुमची नोकरी जाईल असं ती फुलपगारे सरांना सांगते. परंतु, अक्षरा अधिपतीच्या मदतीने फुलपगारे सरांची नोकरी वाचवते. त्यानंतर ती भुवनेश्वरीचे आभार मानण्यासाठीही जाते. यावेळी आता अक्षरा भुवनेश्वरीची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
दरम्यान, चारुहास सरांनंतर आता भुवनेश्वरी तिची बाजू अक्षराला सांगणार आहे. मात्र, ती सत्य परिस्थिती सांगते की नाटक करुन अक्षराचं मन वळवायचा प्रयत्न करते हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.