अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. आरोपी शीजान खानही पोलिसांच्या ताब्यात आहे. दुसरीकडे, मंगळवारी (२७ डिसेंबर) पोलिसांनी तुनिषा शर्माच्या रक्ताचे नमुने, कपडे आणि दागिने तपासणीसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी गळफास घेतलेल्या फासावरील रक्ताचे नमुने घेतले आहेत. तसेच कानातले झुमके आणि गळ्यातील सोन्याची चेनदेखील जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी रक्ताचे नमुने, कपडे आणि दागिने कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. कथित आत्महत्येच्या या संपूर्ण प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, तुनिषा शर्मा आणि आरोपी शीजान खान यांच्यात तीन महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. दोघांमधील हे प्रेमसंबंध फार काळ टिकू शकले नाही आणि तीन महिन्यांतच संपुष्टात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की शीजान खानने दोघांमधील वयातील अंतराबद्दलही सांगितले.वसईच्या आणखी एका पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, पोलीस तुनिषा शर्मा आणि शीजान खान यांचे व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉल रेकॉर्डची पडताळणी करत आहेत. तुनिषा गरोदर आहे का असे विचारले असता, तपास पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक व्हिसेरा तपासणीत गर्भधारणेचे कोणतेही संकेत दिसून आले नाहीत.
२४ डिसेंबरला तुनिषाचा मृतदेह सेटवरील टॉयलेटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. तुनिशाचा सहकलाकार शीजान खान याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली रविवारी अटक करण्यात आली. शीझान खानला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुनिषा शर्माच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी ३ वाजता मीरा रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.