नालासोपारा : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेता शिजान खानला अखेर शनिवारी वसई न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच परवानगीशिवाय देश सोडू नये, यासाठी शिजानला पासपोर्ट जमा करण्यास सांगितले.
तुनिषाने २४ डिसेंबरला कामण येथील अली बाबाच्या सेटवर आत्महत्या केली होती. त्यानंतर वालीव पोलिसांनी शिजान खान यास तुनिषा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली होती. शिजान खान २१ वर्षीय तुनिषा शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. तुनिषा शर्माच्या आईच्या तक्रारीवरून घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी शिजान खानला अटक केली होती. अटक झाल्यापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. आता ६९ दिवसांनंतर जामीन मिळाला आहे.