सोनी सबवरील 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या मालिकेत तुनिशा शर्मा आणि शिजान खान मुख्य भूमिकेत दिसले होते. मात्र, जेव्हापासून तुनिशाने मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली तेव्हापासून ही मालिका आता बंद होणार असल्याचे तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आता निर्मात्यांचे म्हणणे आहे की ही मालिका सुरू राहणार आहे आणि तुनिशा शर्माची भूमिका बदलणार नाही.
तुनिशा शर्माच्या निधनानंतर आणि शिजान खान तुरुंगात गेल्यानंतर 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'च्या चाहत्यांना धक्का बसला. लोकांना वाटत होते की ही मालिका ऑफ एअर जाईल. ही मालिका २२ ऑगस्ट २०२२ला सुरू झाली, त्यामुळे इतक्या लवकर बंद होणे हे निर्मात्यांसाठीही धक्कादायक होते. मात्र, प्रॉडक्शन टीम आणि चॅनलने ही मालिका ऑफ एअर होणार नाही, असा निर्णय घेतला आहे. वाहिनीच्या एका अधिकाऱ्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अधिकारी म्हणतात, मालिका नक्कीच ऑफ-एअर होणार नाही.चालूच राहील.
इतकंच नाही तर मालिकेसोबतच निर्मात्यांनी हादेखील निर्णय घेतला आहे की ते तुनिशा शर्माची व्यक्तिरेखा बदलणार नाहीत. असे म्हटले जात आहे की मालिकेत एक नवीन ट्रॅक सादर केला जाईल, ज्यामध्ये ते नवीन पात्र साकारण्यासाठी अभिनेत्याला कास्ट करतील. शिजान खानचे शोमध्ये पुनरागमनही संशयाच्या भोवऱ्यात आहे. अलिकडे, अभिनेता अभिषेक निगम शिजान खानची जागा घेणार असल्याचे बोलले जात होते, परंतु त्याच्या आईने हे वृत्त फेटाळून लावले.
सध्या 'अली बाबा : दास्तान-ए-काबुल'चे शूटिंग सुरू आहे. तुनिषा शर्माने ज्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती. तिथे शूटिंग होत नाही आहे. घटनास्थळापासून काही किलोमीटर अंतरावर मालिकेचे शूटिंग सुरू आहे. २४ डिसेंबर २०२२ रोजी तुनिशा शर्माने गळफास लावून आत्महत्या केली होती. अभिनेत्रीच्या आईचे आरोप आणि केस फाईलनंतर पोलिसांनी शिजान खानला अटक केली होती. शिजान ३१ डिसेंबर २०२२ पासून १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.