Tunisha Sharma Death Case: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने आत्महत्या केली आणि आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. तुनिशाची आई वनिता यांनी केलेल्या आरोपानंतर आता या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेल्या शिजान खानच्या वकीलांनी आणि कुटुंबीयांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिजानच्या कुटुंबीयांनी तुनिशाच्या आईच्या आरोपांना उत्तर देत, अनेक प्रतिआरोप केलेत. यादरम्यान त्यांनी अनेकदा संजीव कौशल या नावाचा उल्लेख केला. संजीव कौशलचं नाव घेताच तुनिशाला पॅनिक अटॅक यायचे, असा दावा शिजानच्या वकीलांनी केला.
शिजानच्या वकीलांनी केलेल्या दाव्यानुसार, तुनिशा व संजीव शर्माचे नातेसंबंध भयावह होते. संजीव शर्मा हा तुनिषाचा अंकल आहे आणि तो चंदीगडला राहतो. वकीलांनी सांगितलं की, तुनिशा संजीवला घाबरायची. संजीव व आई वनिता तुनिशाच्या पैशांचा व्यवहार बघायचे. तुनिषाच्या पैशांवर या दोघांचा पूर्णपणे कंट्रोल होता. संजीवचे नाव ऐकून तुनिशाला पॅनिक अटॅक यायचे. ती एका एका पैशासाठी आईवर अवलंबून होती. तुनिशाकडे पैसे नसायचे. दरवेळी तुनिशाने पैसे मागितले की तिची आई तिला हजारो प्रश्न विचारायची.
आईने दाबलेला तुनिशाचा गळा?शिजानच्या वकीलांनी केलेल्या दाव्यानुसार, तुनिशा व तिच्या आईचे संबंध ठीक नव्हते. वडिलांच्या निधनानंतर तुनिशा निराश होती. तिला तिचा वाढदिवस सेलिब्रेट करणंही आवडायचं नाही. एकदा संजीवने उकसवल्यामुळे तुनिशाच्या आईने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय तुनिशाचा फोनही तोडला होता. तुनिशाने स्वत: मालिकेच्या दिग्दर्शकासोबत ही गोष्ट शेअर केली होती. तुनिशा स्वत: कमावयाची. पण तिच्या कष्टाचा पैसा तिचा नव्हता. ती यासाठी आईवर अवलंबून होती.
तुनिशाने 24 डिसेंबर 2022 रोजी मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती. तुनिशाच्या आईने लेकीच्या आत्महत्येसाठी शिजान खानला दोषी ठरवलं होतं. शिजानने तुनिशाची ब्रेकअप केलं होतं, म्हणून ती निराश होती. त्याने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला. त्याने माझ्या मुलीला फसवलं, तिचा वापर केला, असे आरोप तुनिशाच्या आईने केले होते. याप्रकरणी शिजान खानला अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.