Join us

राणादा व पाठकबाईंचं ठरलं! हार्दिक व अक्षया ‘या’ ठिकाणी घेणार लग्नाच्या आणाभाका!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 4:10 PM

Hardeek Joshi Akshaya Deodhar : लग्नानंतर अक्षयाने तिची कोणती सवय बदलावी? हार्दिक जोशी म्हणतो....

‘तुझ्यात जीव रंगला’  (Tuzhat Jeev Rangala) या मालिकेतील राणादा व पाठकबाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) व अक्षया देवधर (Akshaya_Devdhar) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. अचानक साखरपुड्याचे फोटो शेअर करत या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. कारण त्याआधी दोघांनीही आपल्या नात्याची भणकही कुणाला लागू दिली नव्हती. अचानक त्यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.  आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती या जोडप्याच्या लग्नाची. हे जोडपं कधी लग्नबेडीत अडकणार? लग्नसोहळा कुठे होणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. तर आता हार्दिक व अक्षया यांनी खुद्द यापैकी काही प्रश्नांची उत्तरं दिली आहे.

हार्दिक व अक्षया यांनी अलीकडे ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोघांनीही मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी लग्न कुठे होणार? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं.  

म्हणून कोल्हापुरातून मागवले होते साखरपुड्याचे कपडे...‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे मी आणि अक्षया आम्ही दोघं भेटलो. या मालिकेमुळेच आम्ही घराघरात पोहोचलो. या मालिकेला कोल्हापुराची पार्श्वभूमी होती. तिथेच सगळं घडलं. म्हणून मग आम्ही खास कोल्हावूरवरून साखरपुड्याचे कपडे मागवले होते, मालिकेच्या आठवणी जपण्याचा आमचा प्रयत्न होता, असं   हार्दिकने सांगितलं.

लग्न पुण्यात....लग्नासाठी आम्ही पुण्याची निवड केली असल्याचं त्यांनी सांगितलं. आमचा पुण्यात लग्न करण्याचा विचार आहे. आम्ही याबद्दल विराजस कुलकर्णी व शिवानी रांगोळी यांच्याशी बोललो आहोत. त्या दोघांना पुण्यातील अनेक लग्नस्थळं माहित आहेत. सध्या ठिकाणाचा शोध सुरू आहे. पण आम्ही पुण्यातच लग्न करणार आहोत, असंही हार्दिक म्हणाला.

लग्नानंतर अक्षयाने ही एक गोष्ट बदलावी...

हा लग्नानंतर अक्षयाने तिची कोणती सवय बदलावी असं तुला वाटतं? हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा हार्दिक म्हणाला, ‘ ती माझी पत्नी होणार आहे. पण त्याआधी ती माझी सगळ्यात जवळची आणि चांगली मैत्रीण आहे. मला तिचा स्वभाव माहित आहे. ती कधी, कुठे कशी रिअ‍ॅक्ट होईल, हे मला आधीच कळतं. कोणत्या परिस्थितीमध्ये ती काय करेल हे मला माहित असतं.  ती फार पटकन रागावते आणि रागाच्या भरात नको ते बोलते,वागते. लग्नानंतर तिची ही सवय तिने बदलावी असं मला वाटतं. तिने तिचा राग थोडा कंट्रोल करावा असं वाटतं, असं हार्दिक म्हणाला.

अक्षया आणि हार्दिक यांनी ठाण्यात ३ मे रोजी साखरपुडा केला होता. तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

टॅग्स :हार्दिक जोशीअक्षया देवधरटेलिव्हिजन