झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेतील देशमुख कुटुंबीयांनी प्रत्येक प्रेक्षकाला आपलंस केलं आहे. त्यामुळे सध्या यातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपल्याच कुटुंबातील एक असल्याचं वाटतं. त्यातच तिखट स्वभावाची रत्नाक्कादेखील प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. प्रत्येक घरात अशी स्पष्टवक्तेपणाने बोलणारी एक तरी व्यक्ती असतेच. त्यामुळे मालिकेत रत्नाक्काचा सीन आला की प्रत्येक जण आवडीने तो भाग पाहतो. विशेष म्हणजे ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारलेली आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात अशा एकत्र कुटुंबात राहणं सध्याच्या घडीला अनेकांना शक्य नसल्याचं रत्नाक्काने म्हणजे अभिनेत्री अपर्णा क्षेमकल्याणी यांनी सांगितलं आहे.
"नात्यांना बहरण्यासाठी प्रेम खूप महत्वाचं असतं आणि ते प्रेम फक्त २ लोकांमध्ये किंवा जोडप्यामध्ये नसून संपूर्ण कुटुंबामध्ये असलं पाहिजे. कुटुंबाला सोबत घेऊन आयुष्याची वाटचाल करत असताना नात्यांची भावनिक गुंतवणूक होत असते आणि नाती बहरात असतात. कुटुंब म्हणजे आपला आधार असतो. तुमच्या पाठीमागे नेहमी कोणीतरी आहे, तुमच्या सुख-दुःखात तुमचे कुटुंबीय सहभागी असतात. एक तीळ सात लोकांनी वाटून खाल्ला कि त्यातील प्रेम, आनंद, जिव्हाळा वाढतो तसाच या मालिकेत सगळ्या कुटुंबियांसोबत आनंद वाढत असतो",असं अपर्णा म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "एक साखळी कड्या जोडून जशी मजबूत होते तशीच मजबूती तुमच्या नात्यात येते, जेव्हा तुमची आपली माणसं जवळ असतील जी तुमच्यावर नि:स्वार्थ प्रेम करतात. सध्या सगळे विभक्त कुटुंबात राहतात त्यामुळे काही प्रसंगी एकाकीपणा घेरून येतो. तो एकत्र कुटुंबात जाणवत नाही. व्यावहारिकदृष्ट्या सध्या एकत्र एका घरात इतक्या माणसांना राहणं शक्य होत नाही. पण, नाती सांधण, मनाने जवळ राहणं हे आपल्या हातात असतं त्यामुळे वेळप्रसंगी एका हाकेवर आपल्या जवळची माणसं आपल्या मदतीसाठी सज्ज होतील अशा प्रकारे आपण नात्यांची जपणूक केली पाहिजे. असा बोध या मालिकेतून मिळतो."