झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सध्या लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेने नुकतेच ५०० भागांचा टप्पा पार केला. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेतील अनुभवलेला ट्विस्ट म्हणजे राणाला मॅटवरची कुस्ती शिकवायला आलेली नवीन लेडी मॅनेजर. आधीच राणा त्याच्या नंदिता वहिनींचा शब्द पाळण्यासाठी त्याच्या मनाविरुद्ध मॅटवरची कुस्ती खेळायला तयार झाला आहे आणि त्यात मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या राणाला मॅटवरची कुस्ती शिकवण्यासाठी एक लेडी मॅनेजर म्हणजेच सखी यांनी राणादावर अनेक निर्बंध लादले आहेत आणि राणादा वैतागून गेला आहे.
राणादाच्या चमचमीत चिकन खाण्यावर बंदी आणल्यानंतर आता मॅनेजरबाईंनी सायकलकडे मोर्चा वळवला आहे, त्यांनी राणाला सायकल चालवायला सांगितली आहे आणि तीसुध्दा सलग 20 किलोमीटर. राणादाला याचा प्रचंड राग आला आहे, पण सायकल चालवण्याशिवाय त्याच्याकडे आता कुठला पर्यायच नाही. चिडलेल्या राणादाला सायकल चालवताना पाठकबाई म्हणजेच अंजली भेटते, मग काय वैतागून तो मॅनेजरबाईंची त्यांच्याकडे तक्रार करतो.पण उलट अंजलीच त्याच्याकडे सायकलवर फेरफटका मारण्याचा हट्ट धरते. मग काय, या शिक्षेमुळेच दोघांना एकत्र सायकल सफर करता येते, ते दोघे याचा कसा आनंद घेतात, त्यांच्या नात्यात कशी रंगत येते? आणि पुढे मॅनेजरबाई आणि राणादा यांच्यात काय नाट्य घडते हे पाहण्यासाठी तुझ्यात जीव रंगला पाहावे लागेल.