टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह (Rituraj Singh) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. टेलिव्हिजनवरील ते प्रसिद्ध चेहरा होते. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ऋतुराज यांनी त्यांच्या कारकिर्दीत थिएटर, टीव्ही आणि सिनेमा अशा सगळ्या क्षेत्रात काम केले. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
ऋतुराज सिंह यांचं संपूर्ण नाव ऋतुराज सिंह चंद्रावत सिसोदिया. त्यांचा जन्म कोटा राजस्थान येथे झाला. वयाच्या १२ व्या वर्षी ते मुंबईत आले. काही वर्ष त्यांनी दिल्ली येथे थिएटरमध्ये काम केलं. यानंतर त्यांनी मालिकांमध्ये भूमिका साकारायला सुरुवात केली. हिटलर दीदी, आहट, दिया और बाती हम, शपथ अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. तर सध्या गाजत असलेल्या अनुपमा मालिकेतही ते दिसले.
मनोरंजनविश्वातून अनेकांनी ऋतुराज यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली आहे. इतक्या लवकर जगाचा निरोप घेतल्याने चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तर अनेकांनी अनुपमा मालिका त्यांच्यासाठीच बघत असल्याचं लिहिलं आहे. अतिशय प्रभावशाली अभिनेत्यांमध्ये ऋतुराज हे देखील होते. त्यांच्या निधनाने हिंदी मनोरंजनसृष्टी शोकसागरात बुडाली आहे.