Join us

'साथ निभाना साथिया' फेम अभिनेत्री अपर्णा काणेकर यांचं निधन, ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 10:49 AM

त्यांनी मालिकेत प्रेमळ 'बा' ची भूमिका साकारली होती.

टेलिव्हिजनवरील हिंदी मालिका 'साथ निभाना साथिया' प्रेक्षकांची आवडती मालिका होती. मालिकेतील कोकिला बेन, गोपी बहू, राशी बहू, अहम जी, जिगर असे अनेक गाजले. त्यातच 'बा' या आजींच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री अपर्णा काणेकर (Aparna Kanekar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

अभिनेत्री  अपर्णा काणेकर म्हणजेच 'बा' साथ निभाना साथियामधील अतिशय प्रेमळ अशा भूमिकेत होत्या. त्यांना या शोमुळे ओळखही मिळाली होती. मालिकेतील अभिनेत्री लवली ससानने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. तिने अपर्णा यांच्यासोबत एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर छान स्माईल आहे तर अभिनेत्री त्यांच्या गालावर प्रेमाने किस करत आहे. तिने या फोटोला कॅप्शन देत लिहिले,"आज माझं मन खूपच जड झालंय. माझी सर्वात जवळची व्यक्ती आणि एक सच्ची योद्धा आज या जगात राहिली नाही. बा तू मला भेटलेली सर्वात स्ट्राँग आणि सुंदर व्यक्ती आहेस. आपल्याला सेटवर सोबत वेळ घालवण्याची आणि आयुष्यभराच्या मैत्रीची संधी मिळाली यासाठी मी देवाचे आभार मानेन. तू कायम स्मरणात राहशील. माझ्या प्रेमळ बा ला शांती मिळो. तुमचा वारसा पुढे चालत राहील."

इतरही अनेक कलाकारांनी अपर्णा काणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 2011 साली अपर्णा यांनी जानकी बा या भूमिकेसाठी ज्योत्स्ना कार्येकर यांना मालिकेत रिप्लेस केलं. त्यांनी ५ वर्ष या मालिकेत भूमिका साकारली. त्यांना चाहत्यांचं खूप प्रेम मिळालं. आता त्यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमृत्यू