अपूर्वा नेमळेकर ही लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये काम करुन तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि करियरमधील अपडेट्स देत असते. दोन वर्षांपूर्वी अपूर्वाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अपूर्वाच्या लहान भावाचं अपघाती निधन झालं होतं. या गोष्टीला आज २ वर्ष पूर्ण होत आहेत. भावाच्या आठवणीत अपूर्वा भावुक झाली आहे.
लहान भावाच्या आठवणीत अपूर्वा भावुक
१४ एप्रिल- या दिवसाने सगळं काही बदललं...
दोन वर्षांपूर्वी मी माझ्या लहान भावाला गमावलं. तो फक्त माझा भाऊ नव्हता तर माझाच एक भाग होता. ओमकार, असा एकही दिवस गेला नाही की मला तुझी आठवण आली नाही. रोज सकाळी उठून हाच विचार मनात येतो की त्या दिवशी नियतीने थोडी दया दाखवली असती तर...जर मी तो दिवस बदलू शकले असते तर...१४ एप्रिल २०२३ माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस.
माझ्यापेक्षा वयाने लहान असूनही तू माझा मार्गदर्शक होतास. माझा बेस्ट फ्रेंड, टीकाकार आणि शहाणा होतास. तू माझ्यातला आवाज होतास. ज्याचाकडे प्रत्येक साध्या आणि किचकट प्रश्नाचंही उत्तर असायचं. तू भावापेक्षाही खूप काही होतास. माझी सगळ्यात सुरक्षित जागा आणि सोबती होतास.
या दोन वर्षात मी खूप काही गमावलं. असे अनेक क्षण आले जेव्हा मला वाटायंच की तू इथे असतास तर...आयुष्य पुढे गेलं आहे पण, मी अजून तिथेच आहे. मला वाटत नाही मी कधी पुढे जाऊ शकेन.
मी काहीच करू न शकल्याची भावना त्रास देते. दिवसेंदिवस माझ्या हृदयावर याचा भार वाढतो आहे. तू जिथे पण असशील तिथे शांती असेल अशी अपेक्षा करते. पण, तू इथे नसल्याची भावना दु:खद आहे. मी तुला खूप मिस करते.
सध्या अपूर्वा प्रेमाची गोष्ट मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अपूर्वाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'रात्रीस खेळ चाले'मधील शेवंताने तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती. तर 'बिग बॉस मराठी'मुळे अपूर्वा चर्चेत होती.