Join us

"आई, तू मरणार आहेस का?" कॅन्सरबद्दल ऐकून टीव्ही अभिनेत्रीला लेकीने विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 16:30 IST

माझी मुलगी अरीजा फक्त ९ वर्षांची होती...

टीव्ही अभिनेत्री छवि मित्तल (Chhavi Mittal) कॅन्सरवर मात करत नव्याने उभी राहिली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तिने ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचा खुलासा केला होता. कॅन्सर अगदीच सुरुवातीच्या स्टेजवर होता. सहा तासांच्या सर्जरीनंतर ती या आजारातून बाहेर आली. नुकतंच तिने दिलेल्या मुलाखतीत कठीण प्रसंगांना कशाप्रकारे तोंड दिलं याबद्दल सांगितलं.

नुकतंच छवि मित्तल आणि तिचे पती मोहित हुसैन यांनी मुलाखतीत आयुष्यातील कठीण प्रसंगांविषयी चर्चा केली. छवि मित्तल म्हणाली, 'मला याबद्दल सर्वात आधी कळलं कारण मी डॉक्टरच्या संपर्कात होते. त्यांनी आधी मलाच फोन केला. रिपोर्ट आलेत आणि ते चांगले नाहीत असं मला कळलं. त्यांनी फक्त माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, 'ठिक आहे आपण याचा सामना करु.'

छवि मित्तलने पुढे सांगितले की 'माझ्या पतीला परिस्थितीची पूर्ण कल्पना असली तरी माझी मुलगी अरीजा जी फक्त ९ वर्षांची होती, तिला हे सांगणं सोप्पं नव्हतं.जेव्हा तिला माझ्या कॅन्सरबद्दल समजलं तेव्हा तिला वाटलं की मी मरणार आहे. पण मी तिला समजावलं की कॅन्सर प्रत्येकासाठीच सारखा नसतो. मी आजारी आहे काही दिवसांसाठी मला रुग्णालयात जावं लागेल. मी ठिक होऊन येईल.'

'माझ्या मुलीला कॅन्सरबद्दल एव्हढंच माहित होतं की त्याने माणूस मरतो. मी काहीच खाऊ शकणार नाही? मी मरणार आहे का? असे प्रश्न तिला पडले. तेव्हा मी तिला नाही असं सांगितलं. एका सर्जरीनंतर मी बरी होणार असंही मी तिला म्हणाले.'

टॅग्स :छावी मित्तलकर्करोगपरिवारटिव्ही कलाकार