स्टारडम सांभाळणं आणि ती बराच काळ समर्थपणे टिकवून ठेवणं हे प्रत्येकालाच जमत नाही. जितक्या वेगाने टीव्ही अभिनेत्री जिया मानेक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली तितक्याच झटकन तिची लोकप्रियताही कमी झाली. 'साथ निभाना साथीयाँ' मालिकेमुळे जिया मानेक घराघरात गोपी बहू म्हणून लोकप्रिय झाली होती. याच मालिकेने तिला ख-या अर्थाने ओळख मिळवून दिली. पैसा,प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा याच मालिकेमुळे जियाला मिळाले.
'गोपी बहू' म्हणून लोकप्रिय होत असतानाच जिया मानेकने मालिकेच्या टीमला पूर्व कल्पना न देताच कलर्स चॅनेलवरील 'झलक दिखला जा' शोमध्ये सहभागी झाली होती. जेव्हा स्टार प्लस चॅनेलला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी जिया मानेकला मालिकेतून काढण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला.
जियाच्या जागी देवोलिना भट्टाचार्यची गोपी बहू भूमिकेसाठी निवड करण्यात आली. 'साथ निभाना साथीयाँ' मालिका सोडल्यानंतर तिच्या वाट्याला फारशा चांगल्या भूमिका आल्या नाहीत. आपल्या अभिनयाने आणि सौदर्यांने रसिकांची लाडकी बनलेली गोपी बहूची जादू पुढे कमी झाल्याचे पाहायला मिळाले.
या मालिकेनंतर जिया मानेकने जितक्या भूमिका साकारल्या त्या भूमिकेला गोपी बहूप्रमाणे रसिकांची पसंती मिळाली नाही. 'साथ निभाना साथीयाँ' मालिकेनंतर जिया 'जिनी और जूजू' मालिकेत दिसली. मात्र या भूमिकेला हवे तसे यश मिळाले नाही.
आता तब्बल ८ वर्षानंतर जियाचे पुन्हा एकदा रसिकांना दर्शन घडणार आहे. जिया 'बिग बॉस १४' मध्ये सहभागी होणार आहे. या शोमुळे ख-या आयुष्यातील जिया चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. जियादेखील खूप उत्सुक आहे.
4 एप्रिल 2012 रोजी जिया मानेक एका वादात सापडली होती. एका रेस्टोबारमध्ये पोलिसांनी रात्री छापा टाकला होता. या रेस्तराँमध्ये हुक्क्याचे सेवन करणाऱ्या 17 जणांना यावेळी पोलिसांनी अटक केली होती.त्यावेळी जिया मानेकसुद्धा रेस्तराँमध्ये उपस्थित होती. जिया देखील संशायाच्या जाळ्यात अडकली होती. यावेळी आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करत असताना जियाचा तेथे उपस्थित कॅमेरामन आणि फोटोग्राफर्ससोबतही वाद झाला होता.मात्र जिया रेस्टाँरंटमध्ये केवळ जेवणासाठी आल्याचे बिलावरून स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तिला लगेचच सोडून दिले होते. पण या प्रकरणानंतर जिया बरेच दिवस चर्चेत राहिली होती.त्यावेळी तिच्याविषयी उलट सुलट चर्चाही रंगायच्या.