‘रामायण’ ही लोकप्रिय मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. साहजिकच प्रेक्षक सुखावले आहेत. 28 मार्चपासून डीडी नॅशनलवर ‘रामायण’ ही मालिका पुन्हा सुरु झाली. ही मालिका पाहतांना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. एवढेच नाही तर सोशल मीडियावरही ‘रामायण’ ट्रेंड करू लागले़.एकीकडे ही लोकप्रिय मालिका सुरु झाल्याने प्रेक्षक सुखावले. पण टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक हिने मात्र वेगळाच सूर आळवला. होय,‘रामायण’ पुन्हा प्रसारित करण्याच्या निर्णयावर कविता कौशिकने असे काही ट्वीट केले की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
‘स्वत: संसदेत बसून मोबाईलवर पॉर्न पाहातात आणि आम्हाला रामायण बघण्यास सांगतात’, असे वादग्रस्त ट्वीट कविताने केले. आपल्या या ट्वीटमधून कविताने राजकीय नेत्यांना लक्ष्य केले. पण तिचे हे ट्वीट युजर्सना अजिबात आवडले नाही. मग काय, कविता प्रचंड ट्रोल झाली. इतकेच नाही तर तिच्या अटकेची मागणीही अनेकांनी केली.
रामायणाची अॅडल्ट फिल्मसोबत तुलना करणा-या कविता कौशिकला तात्काळ अटक करा, अशी मागणी अनेक युजर्सनी केली. एका युजरने कविताला ट्रोल करताना तिला चांगलेच फैलावर घेतले. ‘आम्ही तुला रामायण बघायला सांगितलेले नाही. तू इतकीही महत्त्वाची नाही. डीडी चॅनल कोणत्या नंबरवर येते, हे तरी तुला ठाऊक आहे का. बेकार ट्वीट करू नकोस. वेळेचा सद्उपयोग कर,’ असे या युजरने तिला सुनावले.
तर एकाने ‘ मोबाईलवर तर तू काहीहीत पाहू शकते. रामायण तर टीव्हीवर दाखवले जात आहे,’असे लिहित कविताला ट्रोल केले. कविता कौशिक हिनेही ट्रोलर्सवर पलटवार केला आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रामायण, महाभारत या ऐतिहासिक मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आल्या आहेत.