गेल्या काही वर्षांमध्ये पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील संघर्ष चिघळला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात हजारो नागरिकांनी त्यांचे प्राण गमावले आहेत. या युद्धात टीव्ही अभिनेत्री मधुरा नाईकची बहीण आणि तिच्या पतीची पॅलेस्टाईन दहशतवाद्यांकडून त्यांच्या मुलांसमोरच हत्या करण्यात आली. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आता अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे.
मधुरा नाईकने 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत धर्मामुळे धमकी मिळत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. "ही बातचीत करण्याची वेळ नाही. कारण, आम्ही सगळेच खूप घाबरलेले आहोत. मला आणि माझ्या कुटुंबीयांना धमकीचे मेसेज येत आहेत. हा आमच्यासाठी कठीण काळ आहे. आम्ही आमच्या कुटुंबातील व्यक्तीला गमावलं आहे. माझं कुटुंब सुरक्षित नाही. कृपया आमच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करा," असं मधुरा म्हणाली.
बहिणीच्या हत्येची माहिती देत मधुराने पोस्टमध्ये "आज इस्रायल दुखात असून हमासच्या आगीत लहान मुले, महिला आणि वृद्ध जळत आहेत. माझ्यावर प्रेम करणार्यांना मी सांगू इच्छितो की पॅलेस्टाईन समर्थक प्रचारामुळे इस्रायली मारेकरी दिसत आहेत. हे योग्य नाही. स्वतःचा बचाव करणे म्हणजे दहशतवाद नाही आणि मला हे स्पष्ट करायचे आहे की मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही. कृपया या कठीण काळात इस्रायलमधील लोकांच्या पाठिशी उभे रहा. दहशतवाद्यांचा खरा चेहरा आणि ते किती क्रूर असू शकतात, हे लोकांनी पाहण्याची हीच वेळ आहे," असं म्हटलं होतं. यानंतर तिला धमक्या मिळत आहेत.
मधुरा नायक ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने 'प्यार की ये एक कहानी', 'इस प्यार को क्या नाम दूं', 'हमने ली है शपथ' आणि 'तुम्हारी पाखी' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.