टीव्ही अभिनेत्री माही विजची मुलगी (Mahhi Vij) तारा विज (Tara Vij) नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असते. तिचे व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडतात. ४ वर्षांची चिमुकली तारा तिच्या निरागसतेने तर कधी खट्याळ पद्धतीने नेटकऱ्यांचं मनोरंजन करत असते. माही विज आणि जय भानुशाली यांची तारा ही एकुलती एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच ताराला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने माही आणि जय दोघंही घाबरले आहेत. ताराला गंभीर आजार झाला असून सगळेच तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
आपल्या चिमुकल्याला थोडं जरी काही झालं तरी आईबाबा काळजीने हैराण होतात. १५ ऑगस्ट दरम्यान आलेल्या सलग सुट्ट्यानंतर तारा पुन्हा शाळेत जाऊ लागली. दरम्यान ती तापाने फणफणली. आधी नॉर्मल ताप आहे असं वाटलं मात्र तिचा ताप काही केल्या उतरला नाही. तेव्हा माही विजला चिंता वाटली. तेच माहीने सोशल मीडियावरुन सांगितलं आहे.
माही लिहिते,'गुरुवारी ताराला रात्री १०४ ताप आला. हे आमच्यासाठी वाईट स्वप्नासारखंच होतं.मोठ्या सुट्टीनंतर तारा पुन्हा शाळेत जाऊ लागली. अनेकदा ताप येणे हे फार सामान्य वाटते. पण तारासाठी ते गंभीर बनले.डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिली. इब्युजेसिक प्लस देऊनही तिचा १०४ ताप काही खालीच येत नव्हता.थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या पण काहीच फरक नाही. आमची चिंता वाढली.'
ती पुढे म्हणाली,'रात्री १ वाजता मी डॉक्टरांशी चर्चा केली. मात्र सध्या लहान मुलांमध्ये व्हायरल होण्याचं प्रमाण वाढलंय असं ते म्हणाले. दुसऱ्या दिवशीही ताप कायम असल्याने आम्ही तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट केल्या. तेव्हा कळलं ताराला इन्फ्लुएन्झा ए फ्लु ची लागण झाली आहे. हा रेस्पिरेटरी सिस्टमचा सर्वात व्हायरल इन्फेक्शन आहे.यामध्ये ताप, खोकला आणि इतर लक्षणे दिसतात. काही मुलं एका आठवड्यात बरे होतात. मात्र काहींना अॅडमिट करावं लागतं.'
माहीने इतर पालकांना याविषयी जागरुक केलं आहे. दोन दिवसात ताराला डिस्चार्ज मिळेल असंही तिने सांगितलं. सध्या लहान मुलांमध्ये आजाराचं प्रमाण खूपच वाढलंय. खाण्यापिण्याच्या वेळा, जीवनशैलीतील बदल लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करतात. त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे.