Join us  

अमेरिकेत राहणं खूप अवघड! परदेशात असं आयुष्य जगायची मृणाल, म्हणाली- "तिथे घरकामाला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 9:31 AM

चार वर्षांनी भारतात परतलेली मृणाल दुसानीस म्हणते, "अमेरिकेत स्वच्छता आहे..."

मराठी मालिकांचा लाडका चेहरा आणि कलाविश्वातील हरहुन्नरी गुणी अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस. अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारून मृणालने मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अगदी सालस अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. गेल्या काही वर्षांपासून मृणाल सिनेसृष्टीपासून लांब होती. काही काळ तिने कामातून ब्रेक घेतला होता. पती आणि कुटुंबीयांबरोबर ती परदेशात स्थायिक झाली होती. आता चार वर्षांनी ती भारतात परतली आहे. मृणालने लोकमत फिल्मीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने करिअर, वैयक्तिक आयुष्य याबाबतही भाष्य केलं. 

लोकमत फिल्मीच्या घर, सु्ट्टी आणि बरंच काही या शोमध्ये मृणालने हजेरी लावली. यामध्ये मुंबईतील तिच्या घराची झलक दाखवताना मृणालने अमेरिका आणि भारतातील राहणीमानावरही भाष्य केलं. मृणाल म्हणाली, "मला स्वयंपाकाची आवड हल्लीच निर्माण झाली आहे. मला लोकांना करून खायला घ्यालायला आवडलं. आम्ही लहान असताना माझी आई जॉब करत असल्याने तिचा स्वयंपाक सकाळीच तयार असायचा. पण, कधीतरी ती मला पोळ्या वगैरे करायला सांगायची. पण, नीरजलाही स्वयंपाक येत असल्याने माझा ताण बराचसा कमी होतो. गेली १४ वर्ष तो अमेरिकेत असल्याने त्याला स्वयंपाक करायला लागायचा. आणि त्याला स्वयंपाकाचीही तशी आवड आहे". 

पुढे अमेरिकेतील राहणीमानाबद्दल सांगताना ती म्हणाली, "अमेरिकेत डिश वॉशर वगैरे असतात ही गोष्ट खरी आहे. पण, अमेरिकेत राहणं हे अवघड आहे. त्यामानाने भारतात राहणं खूप सोपं आहे. कारण, आपल्याकडे हाऊसहेल्प (घरकामासाठी मदतनीस) मिळते. पण, तिकडे कोणीच नसतं. डिशवॉशरमधील भांडी पण आपल्यालाच लावावी लागतात. फर्निचर घेतलं तर ते जोडावंही आपल्यालाच लागतं. पण, मुळात आपण अमेरिकेचे नसल्याने भारतीय गोष्टींची आणि कामाची आपल्याला सवय आहे. त्यामुळे मला भांडी घासायलाही काहीच प्रॉब्लेम नाही. डिशवॉशर असले तरी भांडी स्वच्छ होतील की नाही ही शंका असतेच. अमेरिकेत मला आवडायचं कारण तिथे स्वच्छता होती. पण, इथे माझी माणसं आहेत". 

मृणाल दुसानीसने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'तू तिथे मी' या मालिकेतील भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मालिकेमुळे मृणाल प्रसिद्धीझोतात आली. 'अस्सं सासर सुरेख बाई', 'हे मन बावरे' या मालिकांमध्येही ती दिसली होती. 'श्रीमंत दामोदर पंत' या सिनेमातही मृणाल झळकली होती. 

टॅग्स :मृणाल दुसानीसटिव्ही कलाकार