छोट्या पडद्यावरील वादग्रस्त ठरलेल्या 'बिग बॉस १५' चा (bigg boss 15) ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या शोकडे आता सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. यंदाच्या पर्वाचा नेमका कोण विजेता होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. त्यातच सध्या देवोलीना भट्टाचार्जी (devoleena bhattacharjee), राखी सावंत (rakhi sawant), तेस्वी प्रकाश (tejasswi prakash), करण कुंद्रा (karan kundra) आणि अभिजीत बिचुकले (abhijit bichukle) हे काही स्पर्धक सातत्याने चर्चेत येत आहेत. हे स्पर्धक टास्क खेळण्याच्या पद्धतीसोबतच त्यांच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत आहेत. अलिकडेच झालेल्या विकेंड का वॉरमध्ये देवोलीनाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मोठा खुलासा केला. तिचा बालविवाह झाल्याचं तिने जाहीरपणे मान्य केलं आहे.
अलिकडेच झालेल्या 'विकेंड का वॉर'मध्ये बीबी हाऊसमध्ये काही पत्रकारांनी हजेरी लावली होती. यावेळी या पत्रकारांनी घरातील सदस्यांना काही प्रश्न विचारले. यात अनेकांनी एकमेकांवर चिखल फेक केला. इतकंच नाही तर हे सदस्य एका रिपोर्टिंग सेगमेंटमध्येही सहभागी झाले होते. ज्यात राखीने देवोलीनाचं लहानपणी लग्न झाल्याचा दावा केवा. राखीचा हा दावा ऐकल्यानंतर देवोलीनानेही ते मान्य केलं. आणि, तिच्या लग्नाची गोष्ट सांगितली.
"हे खरं आहे की माझं लहानपणी लग्नं झालं आहे. पण, हे लग्न कोणत्याही मुलासोबत झालेलं नाही. तर एका केळीच्या झाडासोबत झालेलं आहे", असं देवोलीना म्हणते. देवोलीनाचं हे वाक्य ऐकल्यावर उपस्थित सारेच जण हसू लागतात. त्यावर आता "ते केळ्याचं झाड मोठं झालं असेल ना?" असा प्रश्न सलमान खान विचारतो. पण," नाही. ते झाडं आता मेलंय", असं उत्तर देवोलीना देते.
दरम्यान, ३० जानेवारी रोजी या शोचा शेवटचा भाग रंगणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात कोण विजेता होणार याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.