टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील एका फसवणुकीच्या प्रकरणाने सर्वांनाच धक्का बसला, ज्यामध्ये जवळपास २५ स्टार्सची तब्बल १.४८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका सेलिब्रिटी मॅनेजरने चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली तेव्हा ही धक्कादायक बाब उघडकीस आली. ही मॅनेजर अनेक स्टार्ससोबत काम करते. मध्य प्रदेशातील Sky63 एनर्जी ड्रिंक्स नावाच्या एनर्जी ड्रिंक्स कंपनीने या स्टार्सना फसवलं आहे. या ब्रँडच्या जाहिरातीसाठी स्टार्सना पैसे दिले गेले नाहीत.
सेलिब्रिटी मॅनेजर रोशन गॅरी बिंदरने या एनर्जी ड्रिंकच्या प्रमोशनसाठी अर्जुन बिजलानी, तेजस्वी प्रकाश, अंकिता लोखंडे, कुशल टंडन, जय भानुशाली, हर्ष राजपूत यांच्यासह अनेक टीव्ही सेलिब्रिटींना सांगितलं होतं पण ब्रँडने यासाठी स्टार्सना पैसे दिले नाहीत. आता अर्जुन बिजलानी याने या स्कॅमबद्दल भाष्य केलं आहे. या एनर्जी ड्रिंक ब्रँडने त्याला ४० लाख रुपये देण्याचं आश्वासन दिल्याचं अभिनेत्याने सांगितलं. मात्र जेव्हा अभिनेत्याला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं तेव्हा त्याने हा प्रोजेक्ट करण्यास नकार दिला.
अर्जुनने सांगितलं की, सेलिब्रिटी मॅनेजर रोशन गॅरी बिंदरने त्याच्याशी ३-४ रील्ससाठी संपर्क साधला होता. रोशन ही इंडस्ट्रीचा एक भाग आहे म्हणून अर्जुनने सुरुवातीला तिच्यावर विश्वास ठेवला. स्कॅममध्ये वाढ झाल्यामुळे त्याने एडवान्स पैसे घेण्यास सुरुवात केली आहे. तो आधी ५० टक्के किंवा पूर्ण पैसे घेतो आणि नंतर काम करतो. सुरुवातीला ब्रँडने अभिनेत्याची ही मागणी मान्य केली होती पण नंतर ते बदलले आणि अर्जुन बिजलानीला आधी शूट पूर्ण करण्यास सांगितलं.
"सूर्यकुमार यादव याच्या नावाचा उल्लेख झाला होता, म्हणून मी सूर्यकुमार यादवशी बोलू का? असं विचारलं. त्यावर त्यांनी नाही, त्याची गरज नाही असं सांगितलं. मला हे विचित्र वाटलं आणि मला माझे पैसे मिळाले नसल्याने मी प्रोजेक्ट कॅन्सल केला. मला सांगण्यात आलं की, कोणीतरी हे काम आधीच केलं आहे, जसं की माझी मैत्रीण अंकिता (लोखंडे). तेव्हा तुम्हाला वाटतं की जर सगळेच असं करत असतील तर ही गोष्ट खरंच खरी आहे की खोटी? पण मी काही तत्त्वांनुसार काम करतो आणि त्यांनी माझ्या कमिटमेंटचा आदर न केल्यामुळे मी त्यांच्यासाठी शूट केलं नाही" असं अर्जुनने सांगितलं.
एका रीलसाठी ८ लाख रुपये ऑफर करण्यात आले होते. त्यानुसार ४-५ रील्ससाठी ४० लाख रुपये मिळणार होते. जेव्हा अभिनेत्याने ब्रँडकडून पैसे मागितले तेव्हा त्यांनी त्याला टाळायला सुरुवात केली. अशा परिस्थितीत त्याने प्रोजेक्ट सोडला. काम करून पैसे न मिळण्यापेक्षा शूटिंग न करणं चांगलं आहे, असं अभिनेत्याने म्हटलं. जर एखादा ब्रँड कोलॅब्रेशनसंदर्भात गंभीर असेल तर त्यांनी सेलिब्रिटींना ३० ते ५० दिवस वाट पाहायला लावण्याऐवजी ५० टक्के पैसे द्यावेत असं ही अर्जुनने म्हटलं आहे.