कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या काळात प्रेक्षकांची मागणी लक्षात घेता दूरदर्शनने ‘रामायण’ व ‘महाभारत’ सारख्या मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनच्या काळात खास लोकांच्या मनोरंजनासाठी हा निर्णय घेण्यात आला आणि आता त्याचे परिणाम समोर आहे. होय, रामायण या मालिकेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद, उदंड प्रेम मिळत असल्याचे चित्र आहे.
टीआरपीच्या चार्टमध्ये रामायण या धार्मिक मालिकेने इतर सर्व मनोरंजन वाहिन्यांना पछाडत, टीआरपीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
सध्या तरी रामायणला टक्कर देणारा अन्य कुठलाही शो कुठेही नाही. गेल्या पाच वर्षांत म्हणजे 2015 पासून आत्तापर्यंत जनरल एंटरटेनमेंट श्रेणीत रामायण बेस्ट शो ठरला आहे. प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी ट्विटरवर याची माहिती दिली.
मला हे सांगताना आनंद होतोय की, दूरदर्शनवर प्रसारित रामायण हा शो 2015 पासून आत्तापर्यंतचा सर्वाधिक टीआरपी मिळवणारा हिंदी जनरल एंटरटेनमेंट शो ठरला आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. BARCIndia च्या हवाल्याने त्यांनी ही माहिती दिली आहे.
त्याकाळातही म्हणजे 1988 साली प्रसारित रामायण या मालिकेने अनोखा इतिहास रचला होता. ही मालिका सुरु झाली की, रस्ते ओस पडत. रामानंद सागर यांच्या या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. विशेषत: अरूण गोविल यांनी साकारलेली प्रभू रामाची भूमिका अफाट गाजली होती. इतकी की, लोकांनी आपल्या घरात राम आणि सीतेच्या तसबीरीच्या रूपात अरूण गोविल आणि दीपिकाचे फोटो लावले होते. आजही लोक श्रद्धाभावाने अरूण गोविल यांच्या पाया पडतात.लॉकडाऊनच्या काळात गत 28 मार्चपासून रामायण पुन्हा प्रसारित केले जात आहे. रोज सकाळी 9 आणि रात्री 9 असे दोन एपिसोड प्रसारित होत आहेत.