अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे अप्पी आमची कलेक्टर (Appi Amchi Collector). या मालिकेने कमी काळात प्रेक्षकांना आपंलंस केलं. त्यामुळे या मालिकेचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यात अलिकडेच अप्पी कलेक्टर झाली आहे. त्यामुळे सध्या या मालिकेला रंजक वळण मिळालं आहे. यामध्येच आता अर्जुनचा भ्रष्टाचार अप्पीसमोर येणार आहे.
पोलिस खात्यात रुजू झाल्यापासून अर्जुन या ना त्या मार्गाने पैसे कमवत असतो. मात्र, हा भ्रष्टाचार कधीही अप्पी समोर येऊ नये यासाठी तो प्रयत्न करत असतो. इतकंच नाही तर बऱ्याचदा अप्पीने त्याला रंगेहात पकडायचाही प्रयत्न केला. परंतु, दरवेळी अर्जुन त्यातून सुखरूपपणे निसटला. मात्र, यावेळी तो पकडला जाणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यात अप्पीने कलेक्टर पदाची धुरा हाती घेतल्यानंतर ती प्रथम भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची फाईल मागते. यामध्ये अर्जुनचीदेखील फाईल आहे. त्यामुळे आता अर्जुनचं बिंग फुटणार असून त्याचा भ्रष्टाचार उघड होणार आहे.
दरम्यान, आता खरोखरच अर्जुनचं सत्य अप्पी समोर येणार का? सत्य समजल्यानंतर त्याचा या दोघांच्या नात्यावर काय परिणाम होणार? अप्पी अर्जुनला माफ करेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.