Join us

गुलाबी रंगात न्हाऊन निघाली कोल्हापूर नगरी, दख्खनचा राजा ज्योतिबा लवकरच रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 5:40 PM

ज्योतिबा देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचं संपूर्ण शूटिंग होणार आहे.

ज्योतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात ज्योतिबा मंदिराचा परिसर दरवर्षी भक्तांनी फुलून जातो. सासनकाठीचं पूजन, गुलाल आणि खोबऱ्याची होणारी उधळण आणि श्रींचा पालखी सोहळा हे नयनरम्य दृष्य दरवर्षी पाहायला मिळतं. कोरोनाच्या संकटामुळे यंदा हे चित्र पाहायला मिळालं नाही. पण स्टार प्रवाहच्या वतीने यंदा ज्योतिबा मंदिर आणि रंकाळा तलाव परिसर गुलाबी रंगात न्हाऊन निघाला. यंदा गुलालाची उधळण करणं शक्य नसलं तरी विद्युत रोषणाईच्या माध्यमातून मंदिरावर गुलाबी रंगाची बरसात झाली. यासोबतच रंकाळा तलावही गुलाबी रंगात न्हाऊन निघाला होता. सरकारी सुचनांचं काटेकोरपणे पालन करत ही नयनरम्य रोषणाई करण्यात आली. डोळ्याचं पारणं फेडणारी ही रोषणाई कोल्हापूर नगरीच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकत होती.

कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या सात महिन्यांहून अधिक काळ भक्तांना ज्योतिबाच्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता आलेलं नाही. मात्र लाडक्या दैवताच्या भेटीची भक्तांची ही आस लवकरच पूर्ण होणार आहे. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना घरबसल्या ज्योतिबाचं दर्शन होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत मालिकेच्या रुपात ज्योतिबा भेटीला येणं हा शुभसंकेतच म्हणायला हवा. स्टार प्रवाह वाहिनी आणि कोठारे व्हिजन्सने हे नवं आव्हान स्वीकारलं असून ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका २३ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विशेष म्हणजे ज्योतिबा देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचं संपूर्ण शूटिंग होणार आहे. कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्यदिव्य सेट आकाराला आला असून मालिकेच्या शूटिंगला याच महिन्यात सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना नवी संधी मिळाली आहे. अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारणार आहे.या भूमिकेसाठी विशालने बरीच मेहनत घेतली असून २० दिवसांत १२ किलो वजन वाढवलं आहे.

 

 

टॅग्स :जोतिबाकोल्हापूर