Join us

मन उडू उडू झालं: मालतीमुळे येणार इंद्रा-दिपूच्या नात्यात दुरावा; देणार 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:04 PM

Man udu udu zal: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये मालती इंद्रा आणि दिपूला एकमेकांपासून लांब राहण्याचा सल्ला देते.

छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'मन उडू उडू झालं'. आतापर्यंत या मालिकेत दिपू आणि इंद्रा यांच्या नात्यात अनेक चढउतार आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या सगळ्यामध्ये या जोडीने एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. परंतु, आता सानिकानंतर दिपूची आई मालतीच त्यांच्या नात्यात अडसर ठरणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये मालती इंद्रा आणि दिपूला एकमेकांपासून लांब राहण्याचा सल्ला देते. काही दिवसांपूर्वीच देशपांडे सर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब साळगांवकरांच्या घरी जातात. यावेळी इंद्रा आणि दिपू यांचं प्रेमप्रकरण मालतीला समजतं.मात्र, ही गोष्ट ती देशपांडे सरांपासून लपवून ठेवते. इतकंच नाही तर हे प्रकरण सरांपर्यंत पोहोचू नये यासाठी ती इंद्रा-दिपूला विभक्त होण्यास सांगते.

या प्रोमोमध्ये मालती इंद्रा आणि दिपूला एकत्र भेटते यावेळी 'इंद्राचं हे गुंड असल्याचं रूप जर देशपांडे सरांच्यासमोर आलं तर ते कधीच लग्नाला परवानगी देणार नाहीत, असं मालती म्हणते, त्यावर 'हो आहे मी गुंड, मी करतो वसुलीचं काम परंतु, दीपिका मॅडमवर असलेलं माझं प्रेम कधीच कमी होणार नाही'. या प्रोमोनंतर दीपू आणि इंद्रामध्ये पुन्हा दुरावा येणार असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, यापूर्वी सानिका सातत्याने इंद्रा आणि दिपू यांच्या नात्यात मतभेद, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, आता मालतीच दिपूला इंद्रापासून दूर होण्याचा सल्ला देत आहे, त्यामुळे या मालिकेत पुन्हा एक नवं वळण येणार असल्याचं पाहायला मिळत आहे. इतंकच नाही तर मालतीच्या समजावण्यानंतर इंद्रा दिपूपासून दूर राहणार असल्याचं आश्वासन देतो. मात्र, या दोघांना एकमेकांपासून दूर राहता येईल का? या दोघांच्या नात्यात आणखी कुठलं नवं वळण येणार असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारऋता दूर्गुळे