छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. या मालिकेत आता नेहा आणि यश यांचं नातं एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. नेहा हळूहळू यशच्या प्रेमात पडली आहे. मात्र, हे नातं ती मान्य करायला तयार नाही. यामध्येच यशचा मोठा अॅक्सिडेंट होणार आहे. त्यामुळे त्याला भेटण्यासाठी नेहा त्याच्या पॅलेसमध्ये जाते. परंतु, सिम्मी तिचा वाईट पद्धतीने अपमान करते.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सिम्मी, नेहाचा अपमान करते. तसंच या घराची सून होण्याची स्वप्न पाहू नकोस असं अप्रत्यक्षरित्या तिला सांगायचा प्रयत्न करते.
"जमिनीवरच्या किड्यांनी जमिनीवरच रहायचं असतं. त्यांनी आकाशात उडण्याची स्वप्नही बघू नयेत. नाही तर पंख फुटण्याआधी ती कधी छाटली जातील हे तुझं तुलाच कळणार नाही. आणि यशची चौकशी करायला आली होतीस ना तो व्यवस्थित आहे," असं सिम्मी म्हणते. तसंच घरातील एका कर्मचाऱ्याकडून १०० रुपये घेऊन ते नेहाच्या हातावर टेकवते.
दरम्यान, सिम्मीने केलेला अपमान नेहाच्या प्रचंड जिव्हारी लागतो. ज्यामुळे ती पुन्हा यशपासून दूर जाण्याचा निर्णय घेते. विशेष म्हणजे नेहा पुन्हा एकदा नेमकी कशामुळे दुखावली गेलीये याची जराही कल्पना यशला नाही. मात्र, तिच्या दु:खामागचं कारण शोधण्यासाठी तो पुन्हा एक नवीन प्रयत्न करताना दिसणार आहे.