अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकली. विशेष म्हणजे ही मालिका पहिल्या भागापासून लोकप्रिय ठरली असून यात नेहा आणि यशच्या प्रेमात येणारे रंजक वळणं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहेत. यामध्येच आता व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने नेहा यशसमोर तिच्या प्रेमाची कबुली देणार आहे.
सध्या सोशल मीडियावर मालिकेचा एक प्रोमो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये शेफाली आणि नेहा व्हॅलेंटाइन डे विषयी बोलतांना दिसत आहे. यामध्येच नेहा यशला थेट तिचं त्याच्यावर प्रेम आहे हे कसं सांगणार असा प्रश्न शेफालीला विचारते. त्यानंतर नेहा आणि यश एका पार्कमध्ये भेटतांना दिसणार आहेत. विशेष म्हणजे या पार्कमध्येच नेहा, यशसमोर तिच्या प्रेमाची कबुली देणार आहे.
दरम्यान, सध्या या मालिकेत नेहा आणि यश यांच्या लग्नासंदर्भात अनेक घटना घडत आहेत. एकीकडे नेहा आणि यशचं लग्न व्हावं अशी आजोबांचीही इच्छा आहे. परंतु, नेहा एका मुलीची आई आहे हे सत्य अद्याप त्यांना माहित नाही. तर, दुसरीकडे आजोबांचा बदला घेण्यासाठी सिम्मीही यशचं नेहासोबत लग्न लावण्यासाठी प्रयत्न करत आहे.