छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या मालिकेविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे नेहा आणि यशची लव्हस्टोरी फुलत आहे. तर, दुसरीकडे सिम्मीच्या मनात आजोबांविषयी तीव्र राग निर्माण झाला आहे. त्यामुळेच आजोबांना धडा शिकवण्यासाठी सिम्मीने एक नवा प्लॅन आखला आहे. विशेष म्हणजे नेहाचा तिरस्कार करणारी सिम्मी तिचंच यशसोबत लग्न व्हावं यासाठी प्रयत्न करणार आहे.
सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सिम्मी यश आणि नेहाचं लग्न लावण्यासाठी पुढाकार घेणार आहे.विशेष म्हणजे आजोबांना चार लोकांमध्ये जो अपमान केला होता. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सिम्मी यशला साथ देणार आहे.
काही दिवसांपूर्वी सिम्मीने यशसाठी एक स्थळ आणलं होतं. परंतु, ज्या मुलीला तिने यशची पत्नी म्हणून निवडलं ती मुलगी घटस्फोटीत होती. तसंच तिच्या पदरात एक लहान मुलगीदेखील होती. त्यामुळे संतापलेल्या आजोबांनी सिम्मीला चांगलंच सुनावलं होतं. इतकंच नाही तर तिला घरातूनही हकलून लावलं होतं. त्यामुळेच सिम्मीने आजोबांचा बदला घ्यायचं ठरवलं आहे.
दरम्यान, यशच्या मुलीवर प्रेम करतो ती नेहादेखील एका मुलीची आई आहे हे सिम्मीला कळून चुकलं आहे. त्यामुळे आता नेहाचा विरोध करणारी सिम्मी आजोबांची जिरवण्यासाठी मुद्दाम यश आणि नेहाचं लग्न लावण्याचा प्रयत्न करणार आहे. आता सिम्मीचा हा डाव यश आणि नेहाच्या लक्षात येतो का? आजोबा या लग्नाला तयार होतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मालिकेच्या माध्यमातून मिळणार आहेत.