'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath) या मालिकेत सध्या अनेक उत्कंठावर्धक वळणं येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेत यश आणि नेहाचं मोठ्या थाटात लग्न झालं. या लग्नानंतर चौधरी कुटुंबात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. यात आजोबांनी घरातली जवळपास सगळेच अधिकार नेहाच्या स्वाधीन केले आहेत. मात्र, यामुळे नाराज असलेली सिम्मी वारंवार नेहाला कोणत्या ना कोणत्या डावात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे नुकतेच अधिकार मिळालेल्या नेहाच्या हातून एक मोठी चूक झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये नेहाच्या हातून एक मोठी चूक घडते. मात्र, त्या बदल्यात आजोबांनी तिला दिलेली शिक्षा थक्क करणारी आहे.
आजोबांनी संपूर्ण घराची जबाबदारी नेहाच्या खांद्यावर दिली आहे. त्यामुळे घरातील तिजोरीच्या चाव्या आणि सगळे महत्त्वाचे अधिकारही तिलाच दिले आहेत. यामध्येच घराच्या चाव्या नेहाकडे असताना घरातून मोठी रक्कम चोरीला जाते. मात्र, नेहा प्रामाणिकपणे तिची चूक कबूल करते आणि माझ्या बेजबाबदारपणाची शिक्षा मला द्या असं आजोबांना सांगते. विशेष म्हणजे नेहाला शिक्षा देण्याऐवजी आजोबा तिला मुंबई ऑफिसची संपूर्ण जबाबदारी सोपवतात.
दरम्यान, आजोबांच्या या निर्णयामुळे घरातील प्रत्येक जण थक्क होतो. इतकंच नाही तर पैसे चोरीला जाण्यामागे आजोबांचाच हात असावा त्यांनीच नेहाची परिक्षा घेण्यासाठी हा डाव आखला असेल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता नेहाला मुंबई ऑफिसची जबाबदारी सोपवल्यानंतर सिम्मी पुन्हा कोणता डाव आखणार? नेहा या सगळ्या जबाबदाऱ्या कशा पार पाडणार हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.