अनेक लोकप्रिय मालिका व चित्रपट दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक रामवृक्ष गौड यांच्यावर आज ठेल्यावर भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे. एका पेक्षा एक सरस कलाकारांना आपल्या इशा-यावर नाचवणारा हा दिग्दर्शक आज परिस्थितीपुढे हतबल झाला आहे. या दिग्दर्शकाने ‘बालिकावधू’ ही गाजलेली मालिका दिग्दर्शित केली होती.रामवृक्ष सध्या उत्तर प्रदेशातील आपल्या घरी आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन काळात ते उत्तरप्रदेशातील आपल्या घरी आले आणि तिथेच अडकले. मुंबईला परतणे शक्य न झाल्याने आणि गाठचे सगळे पैसे संपल्याने सध्या रामवृक्ष गल्लोगल्ली ठेल्यावर भाजीपाला विकत आहेत.
‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी परिस्थिती कथन केली. लॉकडाऊनमुळे मुंबईत फिल्मी काम बंद होते. लॉकडाऊनमुळे अख्खे आयुष्य बदलले. कुटुंबाची जबाबदारी होती. त्यामुळेच मला भाजीपाला विकावा लागतोय. मात्र ही परिस्थिती सुधारेल आणि पुन्हा आधीचे जीवन सुरू होईल अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. त्यांची पत्नी अनिता गौड यांनीही हाच विश्वास बोलून दाखवला. परिस्थिती बिघडली असली तरी चिंता नाही. आज नाहीतर उद्या परिस्थिती सुधारेल ही आशा आहे, असे त्या म्हणाल्या.
त्यांची मुलगी नेहा हिनेही, परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही पुन्हा मुंबई मित्रमैत्रिणींसोबत शाळेत जाऊ, असे म्हटले.रामवृक्ष यांनी 25 हून अधिक मालिका आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. बालिका वधू, ज्योती, कुछ तो लोग कहेंगे, सुजाता सारख्या अनेक मालिका त्यांनी दिग्दर्शित केल्या आहेत. गेल्या 22 वर्षांपासून ते याच क्षेत्रात आहेत.
2002 मध्ये रामवृक्ष आपल्या एका मित्राच्या मदतीसाठी मुंबईत आले होते. यानंतर मुंबईच त्यांची कर्मभूमी बनली होती. फिल्मी इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला. अगदी सुरुवातीला टीव्ही प्रॉडक्शनच्या वेगवेगळ्या भागांत काम केले. अगदी इलेक्ट्रिशिअनचेही काम केले. अनुभवासोबत अचानक त्यांच्या भाग्याने कलाटणी घेतली आणि त्यांना दिग्दर्शनाची संधी मिळाली. मग त्यांनी याच क्षेत्रात पुढे जायचे ठरवले.