कोणताही सेलिब्रेटी हा मोठाल्या हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये आपला वेळ घालवणे पसंत करतो असेच आपल्याला वाटत असते. पण यासाठी एक सेलिब्रेटी अपवाद आहे. मीरा देवस्थळेला हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा रस्त्यावरील हातगाड्यांवर मिळणारे पदार्थ अधिक आवडतात. मीरानेच ही गोष्ट नुकतीच तिच्या चाहत्यांना सांगितली आहे.
'उडान' या कलर्स वाहिनीवरील प्रसिद्ध मालिकेत चकोरची प्रेमळ प्रमुख भूमिका मीरा देवस्थळे साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक घटनांवर आधारित असलेल्या 'उडान' या मालिकेने त्याच्या रंजक आणि समाजाशी संबंधित असलेल्या कथेने रसिकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेने काहीच महिन्यांपूर्वी पाच वर्षांचा लीप घेतला. त्यानंतर मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळाले होते. लीपनंतर तर ही मालिका प्रेक्षकांना अधिकच आवडत आहे. या मालिकेत आता पुढे काय होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
उडान मधील चकोर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीरा देवस्थळेला तर या मालिकेमुळे चांगलाच फायदा झाला आहे. ती आज भारतीय टेलिव्हिजन वरील लाडक्या पात्रांपैकी एक आहे. आझादगंजमधील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ती झटत असते. तसेच वेठबिगारी विरुद्ध ती शूरपणे लढत आहे असे या मालिकेत आपल्याला पाहायला मिळते. यामुळे चकोर अनेकांसाठी प्रेरक ठरली आहे आणि आता तर ती रॉ मध्ये सामील होत आहे. देशाच्या अभिमानासाठी ती लढणार आहे. हे पात्र साकारण्यासाठी मीरा देवस्थळेने कठोर परिश्रम घेतले आहेत. या भूमिकेसाठी ती सध्या जास्तीत जास्त वेळ देत आहे. या भूमिकेप्रमाणे मीराला सुद्धा अगदी साधी आणि सरळ जीवनशैली आवडते. मीराने सांगितले की, रस्त्यावरील खाणे मला नेहमीच आवडते. मी माझ्या कामात व्यग्र नसेल तेव्हा माझ्या मित्रांना आवर्जून भेटते. आम्ही एखाद्या कॅफेमध्ये जाण्याऐवजी रस्त्यावरील स्वादिष्ट खाणे विशेषतः चाट खाणे पसंत करतो. रस्त्यावरील ठेल्यावरील वडापाव, पाणी पुरी, डोसा, दाबेली खायला मला खूप आवडते. एखादा पदार्थ ठरावीक ठिकाणी चांगला आहे असे मला कळले तर मी तिथे नक्कीच जाते.